संकेतस्थळ दुसऱ्या दिवशीच बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

परवान्यासाठी रिक्षाचालकांची आरटीओ कार्यालयात धाव

परवान्यासाठी रिक्षाचालकांची आरटीओ कार्यालयात धाव
पुणे - रिक्षा परवान्याचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी "दिल्ली एनआयसी'ने तयार केलेल्या संकेतस्थळाचे सोमवारी उद्‌घाटन झाले खरे; परंतु आज दुसऱ्याच दिवशी हे संकेतस्थळ बंद पडले. ही वेबसाइट ओपन होत नसल्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली. दरम्यान, दिल्ली येथील "एनआयसी'च्या इमारतीला आग लागल्याने हे संकेतस्थळ बंद असल्याचे आरटीओच्या सूत्रांनी दिले.

जून महिन्यात शासनाने रिक्षा परवाने खुल्या पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने इच्छुकांनी गर्दी केली. त्यांच्या सोयीसाठी पुणे आरटीओ कार्यालयाने ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील, असे जाहीर केले. त्यांची दखल घेत परिवहन विभागाने राज्यासाठी एकच संकेतस्थळ तयार करण्याचे काम "दिल्ली एनआयसी'ला दिले. गेल्या आठवड्यात या संकेतस्थळाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशीच मंगळवारी हे संकेतस्थळ बंद पडले. अनेकांनी आरटीओ कार्यालयात धाव घेत आरटीओ अधिकाऱ्यांना ही व्यथा सांगितली.

दरम्यान, एकाच वेळी अनेक इच्छुकांनी संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याने ते बंद पडले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र दिल्ली येथील "एनआयसी'च्या इमारतीला आग लागल्यामुळे हे संकेतस्थळ बंद पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

ऑनलाइनचा हट्ट का?
ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर या शहरांतील आरटीओ कार्यालयांमध्ये पारंपरिक पद्धतीने रिक्षा परवाना वाटप करण्यात येत आहे. पुणे आरटीओ मात्र गेल्या दीड महिन्यापासून संकेतस्थळ तयार करत होते. त्याचे उद्‌घाटन झाल्यानंतर एका दिवसातच त्याचा बोजवारा उडाला. त्यामुळे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरात जुन्याच पद्धतीने रिक्षा परवाना वाटपाचे काम सुरू असताना, पुण्यातच ऑनलाइनचा हट्ट का? असा प्रश्न रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: pune news rto website close