तब्बल दहा दिवस उलटले तरी 'आरटीओ'ची वेबसाइटच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

रिक्षा परवाना अर्जासाठी इच्छुक प्रतीक्षेत; पालकमंत्र्यांना साकडे

रिक्षा परवाना अर्जासाठी इच्छुक प्रतीक्षेत; पालकमंत्र्यांना साकडे
पुणे - कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, रिक्षा चालकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दहा दिवस उलटले तरी त्या संबंधीची वेबसाइट सुरू झालेली नाही. ती कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत रिक्षा चालक आहेत.

सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा परवाना खुला करण्याचा निर्णय दहा दिवसांपूर्वीच घेतला गेला. इच्छुकांनी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केल्यानंतर "आरटीओ'ने परवान्याचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा, अशी सूचना केली होती. त्यासाठी वेबसाइट तयार करण्याची घोषणाही केली. मात्र, अद्याप ही वेबसाइट तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षा चालक नाराजी व्यक्‍त करीत आहेत. दरम्यान, रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे म्हणाले, ""केंद्र सरकारने रिक्षा परवाना खुला केला, परंतु "आरटीओ'कडून अद्याप एकही परवाना दिला गेला नाही. दहा दिवसांनंतरही संबंधित वेबसाइट सुरू झालेली नाही. ऑनलाइन चारित्र पडताळणीसाठी करावयाचा अर्जदेखील किचकट असल्याने रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आरटीओने याची दखल घेऊन तातडीने ही वेबसाइट सुरू करावी.''

पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी
रिक्षा परवाना मिळविणे हे अनेक रिक्षा चालकांचे स्वप्न आहे. सरकारच्या निर्णयामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र, आरटीओच्या कारभारामुळे परवाना मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. परवाना अर्ज भरण्यासाठीची वेबसाइट त्वरित सुरू करावी, चारित्र पडताळणी पद्धत सुलभ व्हावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आरटीओ अधिकारी आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी, अशी मागणी बापू भावे यांनी केली आहे.

Web Title: pune news rto website not start