सदाभाऊंनी "स्वाभिमानी' सोडला; आता 'बांधा'वरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - ""स्वाभिमानी संघटनेच्या सदस्यांच्या चौकशी समितीसमोर प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत. स्वाभिमानीला पूर्णविराम दिला आहे; पण नेतृत्वाने पुढील निर्णय लवकरात लवकर घ्यावा. यापुढे कोणत्याही चौकशी समितीला सामोरे जाणार नाही. नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानंतर माझी पुढील भूमिका मांडेन,'' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

नवीन शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी संघटनेने दशरथ सावंत, रविकांत तुपकर, सतीश काकडे आणि प्रकाश रोकडे यांची चौकशी समिती नेमली होती. त्याला सदाभाऊ आज सामोरे गेले. त्यानंतर सदाभाऊ पत्रकारांना म्हणाले,""शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या खाऊन, तुरुंगात जाऊन मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या शेतकरी संघटनेमध्ये मी वाढलो. त्यांच्यामुळे मी मंत्रिपदी बसलो. परंतु गेल्या सहा ते सात महिन्यांपासून माझ्यावर वाटेल ते आरोप आणि टीका झाली. अपमानास्पद शब्द वापरले. संघटनेत अंतर्गत वाद निर्माण झाला. स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाने चौकशी समिती नेमली. त्यांच्या प्रश्‍नपत्रिकेची सविस्तर उत्तरे दिली. टीका टिप्पणीवरील माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. आता जो निर्णय घ्यायचा तो नेतृत्वाने लवकर घ्यावा. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर राज्यातल्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन पुढील निर्णय जाहीर करू. ऑगस्ट महिन्यात राज्यभरात दौरा काढून बांधावर जाऊन शेतकरी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. अधिवेशनानंतर दोनदिवसीय शिबिरामध्ये अंतिम घोषणा करणार आहे. तूर्त मंत्री व शेतकरी नेता म्हणून राज्याचा दौरा करणार, कोणत्याही "बॅनर'खाली शिबिर घेणार नाही, कार्यकर्त्यांचे शिबिर घेणार आहे.'' 

राजीनाम्यासंदर्भात बोलणे टाळले 
""चौकशी समितीच्या सदस्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याचा पर्याय सुचविला. त्याला मी सकारात्मक होकार दिला आहे. संवाद करण्यासाठी तयार आहे. नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याची तयारी मी वारंवार दर्शविली आहे. चौकशी समितीला सामोरे गेलो. चेंडू त्यांच्या कोर्टात आहे, त्यांनी निर्णय द्यावा. स्वाभिमानी संघटनेचा पाच वर्षांसाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत खासदार शेट्टी 26 जुलै रोजी घोषणा करणार आहेत, त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन,'' असे सांगत राज्यमंत्री खोत यांनी राजीनाम्यासंदर्भात जास्त बोलणे टाळले. 

Web Title: pune news sadhabhau khot