संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे - संशोधनपर कामासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे.

पुणे - संशोधनपर कामासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे.

कोणत्याही क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ देण्यात येते. तर हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, जैवतंत्रज्ञान व कुक्कुटपालन क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना दामोदर माधव ओक आणि सुधा दामोदर ओक यांच्या नावाने पाठ्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालये, विद्यापीठे किंवा तत्सम संशोधन संस्थांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी व शिक्षक यासाठी अर्ज करू शकतील, असे ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे कार्यकारी सचिव डॉ. अ. श्री. कालगावकर यांनी सांगितले.

निवड झालेल्या संशोधकांना शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्ती म्हणून संशोधनावर होणाऱ्या खर्चापोटी प्रत्येकी ४० हजार रुपये देण्यात येतील. संशोधन प्रकल्पाच्या पहिल्या वर्षातील प्रगतीचे तज्ज्ञांमार्फत अवलोकन केल्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी तेवढीच रक्कम मंजूर करण्याबाबत विचार होईल.

शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तीच्या छापील अर्जांसाठी इच्छुकांनी विनंती पत्रासोबत दहा रुपयांचे टपाल तिकीट लावलेले व स्वतःचे नाव, पत्ता लिहिलेले पाकीट ‘कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२’ या पत्त्यावर २० जानेवारीपर्यंत पाठवावे. संपूर्ण भरलेले अर्ज ३० जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील.

अर्जांची छाननी व आवश्‍यकतेनुसार इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’साठी दोन आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी दोन अशा चार संशोधकांची निवड करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क ः (०२०) २४४०५८९४/९५/९७ (सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० रविवार व शासकीय सुट्या वगळून)

Web Title: pune news Sakal India Foundation Scholarship

टॅग्स