पुणेकरांसाठी दर्जेदार नाटकांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - दसरा- दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला रंगभूमीप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, या महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील शुभारंभ होणाऱ्या ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. ‘वेलकम जिंदगी’मधून अभिनेते भरत जाधव व डॉ. गिरीश ओक प्रमुख भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

पुणे - दसरा- दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला रंगभूमीप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, या महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील शुभारंभ होणाऱ्या ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. ‘वेलकम जिंदगी’मधून अभिनेते भरत जाधव व डॉ. गिरीश ओक प्रमुख भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

जून महिन्यात आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाला नाट्यरसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पुन्हा होणाऱ्या या विशेष नाट्य महोत्सवात ‘वेलकम जिंदगी’बरोबरच प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खाल्लेला माणूस’, स्पृहा जोशी व उमेश कामत यांच्या ‘डोण्ट वरी बी हॅपी’ आणि मुक्ता बर्वे व अजय पूरकर यांच्या ‘कोडमंत्र’ या नाटकांचे प्रयोग येत्या शनिवारी (३० सप्टेंबर), रविवारी (१ ऑक्‍टोबर) आणि मंगळवारी (३ ऑक्‍टोबर) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहेत. ‘वेलकम जिंदगी’चा प्रयोग ४ ऑक्‍टोबर रोजी होईल.

दर्जेदार अभिनयाची मेजवानी देणाऱ्या या महोत्सवाच्या चारही दिवसांसाठीची; तसेच प्रत्येक प्रयोगासाठीची प्रवेशिका रविवारपासून (ता. २४) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपलब्ध झाली आहे. संपूर्ण महोत्सवासाठी रु. १०००, तर प्रत्येक दिवसासाठी रु. ३०० व रु. २५० (बाल्कनी) असे प्रवेशमूल्य आहे.

मराठे ज्वेलर्स महोत्सवाचे मुख्य प्रायोजक; तर देवधर ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स मुख्य सहप्रायोजक आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहप्रायोजक आहेत.

‘सकाळ’ नाट्य महोत्सव
कधी : शनिवार (ता. ३०), रविवार (१ ऑक्‍टोबर), मंगळवार (३ ऑक्‍टोबर) आणि बुधवार (४ ऑक्‍टोबर) 
कोठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
केव्हा : रोज रात्री ९.३० वाजता
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण व वेळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८)
मराठे ज्वेलर्स, लक्ष्मी रस्ता आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गणंजय सोसायटी आणि डहाणूकर कॉलनी शाखा (सकाळी ११ ते सायंकाळी ५)
ऑनलाइन बुकिंगसाठी : www.ticketees.com
अधिक माहितीसाठी संपर्क : ९५९५८३०५५५.

‘वेलकम जिंदगी’ हे नाटक घेऊन आम्ही ‘सकाळ नाट्य महोत्सवा’त सहभागी होत आहोत. पुण्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. याबाबत जेवढी उत्सुकता आमच्या मनात आहे, तेवढीच उत्सुकता ‘सकाळ नाट्य महोत्सवा’त येऊन नाटक सादर करण्याचीही आहे. कारण या महोत्सवात जाणकार प्रेक्षक सहभागी होत असतात. बाप आणि मुलाच्या नातेसंबंधांवर आधारित असलेले ‘लाइट मूड’मधील हे नाटक आहे. 
- भरत जाधव, अभिनेता 

मागच्या वर्षीही आम्ही ‘सकाळ नाट्य महोत्सवा’त सहभागी झालो होतो. त्या वेळी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसाच प्रतिसाद यंदाही मिळेल, असा विश्‍वास आहे. कारण या महोत्सवाच्या मागे ‘सकाळ’ उभा आहे. नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी अशा महोत्सवांचा नेहमीच उपयोग होतो. शिवाय, प्रेक्षकांना चांगली कलाकृती पाहायला मिळते आणि कलाकारांनाही चांगले प्रेक्षक लाभतात. आम्ही या महोत्सवात ‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकाचा प्रयोग सादर करणार आहोत.
- उमेश कामत, अभिनेता 

नामवंत कलावंतांच्या एकत्रित प्रयत्नांतून तयार झालेल्या उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम ‘सकाळ नाट्य महोत्सव’ करत आहे. त्यामुळे आम्ही या महोत्सवाच्या पाठीशी आहोत आणि पुढेही राहणार आहोत. महोत्सवात सहभागी होणे, त्याचा एक घटक असणे, याचाही एक वेगळाच आनंद आहे. तो आम्ही अनुभवत आहोत. यंदाही अशाच दर्जेदार कलाकृती या नाट्य महोत्सवातून पुणेकरांसमोर आणत आहोत. त्याचा आस्वाद आवर्जून पुणेकरांनी घ्यावा.
- मिलिंद मराठे, संचालक, मराठे ज्वेलर्स

Web Title: pune news sakal natya mahotsav