‘सकाळ’ महोत्सवात गुणवत्तेवर शिक्कामोर्तब!

‘सकाळ’ महोत्सवात गुणवत्तेवर शिक्कामोर्तब!

पुणे - ‘‘सकाळ नाट्यमहोत्सवामध्ये जेव्हा एखाद्या नाटकाचा समावेश केला जातो, तेव्हा नाट्यरसिकांसाठी ती दर्जाची हमी असते, एका अर्थी त्या नाटकाच्या गुणवत्तेवर ते शिक्कामोर्तबच असते!,’’ या शब्दांत अभिनेत्री स्पृहा जोशींनी या महोत्सवाबद्दल आपली भावना व्यक्त केली. तर ‘‘पुण्यात प्रयोग करताना प्रेक्षकांच्या अचूक प्रतिसादांमधून नाटकातल्या वेगळ्या ‘जागा’ नव्याने सापडतात!,’’ असे अभिनेता उमेश कामत यांनी आवर्जुन सांगितले. 

महोत्सवानिमित्ताने आयोजित ‘कॉफी विथ कलाकार’ या दिलखुलास गप्पांच्या कार्यक्रमात हे दोघेही सहभागी झाले होते. ‘डोन्ट वरी बी हॅपी’ हे राज्य नाट्यस्पर्धेत पहिला पुरस्कार मिळालेले व रसिकांनीही उदंड प्रतिसाद दिलेले नाटक यंदाच्या नाट्यमहोत्सवात होत आहे. या नाटकाचे सहकलाकार व सहाय्यक दिग्दर्शक आशुतोष गोखले आणि ‘एसटीए’चे संचालक शैलेश कन्नव हेही या वेळी उपस्थित होते.

गुरुवार (ता.८) पासून ‘सकाळ’ आयोजीत यंदाच्या या नाट्यमहोत्सवाचा प्रारंभ होतो आहे. ‘पीएनजी. ज्वेलर्स’ प्रस्तुत या महोत्सवाला ‘एसटीए हॉलिडेज’चे सहकार्य लाभत आहे. ‘निरामय वेलनेस सेंटर’ व ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ हे सहप्रायोजक आहेत.

‘‘फुलायला वेळच न मिळणाऱ्या भावनांचा कोंडमारा होत असलेल्या आजच्या तरुण जोडप्यांच्या घुसमटलेल्या नातेसंबंधाचे प्रत्यकारी दर्शन नाटकात होत असल्याने आपल्यातल्या अनेकांना त्यात आपलेच प्रतिबिंब दिसते, हे या नाटकाच्या मोठ्या यशामागील कारण असावे,’’ असे मत उमेशने गप्पात मांडले. तर ‘‘आजचे तरुण नाटककार आजच्या संवेदनांचे विषय आजच्या भाषेत मांडतात, त्यामुळे ते अधिक आपले वाटतात व थेट भिडतातही’’ असे निरीक्षण स्पृहानी नोंदविले. 

‘नाटक व चित्रपट या दोन्ही माध्यमांची आपआपली बलस्थाने आहेत, त्यातल्या वेगवेगळ्या आवाहनांचा कलाकार घडण्यास निश्‍चितच पूरक परिणाम घडतो...’‘निश्‍चित कथा व शेवट ठरलेल्या टीव्ही मालिका आपला दर्जा टिकवू शकतात, जे आवश्‍यक आहे...’ ‘टीव्हीमुळे कलाकार घरोघरी पोचतात व त्यांची ओळख निर्माण होते. टीव्हीवरच्या लोकप्रियतेचा आजच्या व्यावसायिक नाटकांच्या आर्थिक यशाला मोठा हातभार लागताना दिसतो आहे...’ असे विविध विषय या रंगलेल्या गप्पांमध्ये चर्चिले गेले. आजच्या अस्वस्थ काश्‍मीरच्या वेदनेचा अनुभव देणारी स्पृहाने म्हटलेली तिचीच कविता या गप्पांच्या मैफलीला शेवटी एका वेगळ्याच अभिजाततेला नेणारी ठरली. 

थोड्याच प्रवेशिका शिल्लक 
गुरुवार, ८ जून : ‘कोडमंत्र’ - मुक्ता बर्वे व अजय पुरकर
शुक्रवार, ९ जून : ‘साखर खाल्लेला माणूस’ - प्रशांत दामले व शुभांगी गोखले
शनिवार, १० जून :‘डोन्ट वरी बी हॅपी’ - स्पृहा जोशी व उमेश कामत
रविवार, ११ जून : ‘दोन स्पेशल’ - जितेंद्र जोशी व गिरिजा ओक-गोडबोले
मंगळवार, १३ जून : ‘कार्टी काळजात घुसली’ - प्रशांत दामले व तेजश्री प्रधान
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, वेळ : रोज रात्री ९.३० वाजता  
प्रवेशिका : पूर्णोत्सव प्रवेशिका रु. १२००, प्रत्येक नाटकासाठी 
रु. ३०० व रु. २५० (बाल्कनी) असे प्रवेश मूल्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com