महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आठ कोटींची औषध खरेदी 

सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - औषधे नसल्याने "अशक्त' झालेल्या महापालिकेच्या रुग्णालयांना आठ कोटी रुपयांची औषध खरेदी करून "डोस' देण्यात येणार आहे. या औषध खरेदीचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. 

पुणे - औषधे नसल्याने "अशक्त' झालेल्या महापालिकेच्या रुग्णालयांना आठ कोटी रुपयांची औषध खरेदी करून "डोस' देण्यात येणार आहे. या औषध खरेदीचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये इंजेक्‍शन सीरिंजपासून ते प्रसूतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्‍यक औषधांपर्यंत अभूतपूर्व तुटवडा झाल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेअंतर्गत औषध खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात सहा जणांनी निविदा भरल्या होत्या. त्यातील "बी' पाकीट उघडण्यात आल्या. एस. बी. जोशी आणि कंपनी सर्वांत कमी किमतीची निविदा भरली असून, त्या खालोखाल श्रीराम डिस्ट्रिब्यूटर यांनी निविदा भरली होती. 

या प्रक्रियेपाठोपाठ आता महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना लागणाऱ्या औषधांसाठी एकत्रित औषध खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्या अंतर्गत आठ कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 14 जणांनी निविदा भरल्या आहेत. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा सुरळीत होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. 

यापूर्वीच्या औषध पुरवठादारांनी जेनेरिक औषधे त्याच्या मूळ किमतीच्या (एमआरपी) वीस टक्के सवलतीने देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी बाजारपेठेत हीच औषधे सर्रास एमआरपीपेक्षा 60 ते 70 टक्के कमी दराने मिळत असल्याचे उघड केले होते. त्यामुळे या औषध खरेदी प्रक्रियेत जेनेरिक आणि ब्रॅंडेड अशा पद्धतीने औषध खरेदी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही खरेदी प्रक्रिया होत आहे.