समाजरूपी विघ्नहर्त्याचे पाठबळ उभे करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

व्यवस्थेला प्रश्‍न विचारणे, वाचकांना माहिती देणे ही पत्रकारितेची मूलभूत कर्तव्ये करीत असतानाच, प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे आणि समाजहितैषी व्यक्तींना, संस्थांना बळ देण्याचा प्रयत्न करणे, हे ब्रीद ‘सकाळ’ने नेहमीच जपले आहे. हे करत असताना ‘सकाळ’ने कधी ना जातपात बघितली ना आर्थिक स्तर.

व्यवस्थेला प्रश्‍न विचारणे, वाचकांना माहिती देणे ही पत्रकारितेची मूलभूत कर्तव्ये करीत असतानाच, प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे आणि समाजहितैषी व्यक्तींना, संस्थांना बळ देण्याचा प्रयत्न करणे, हे ब्रीद ‘सकाळ’ने नेहमीच जपले आहे. हे करत असताना ‘सकाळ’ने कधी ना जातपात बघितली ना आर्थिक स्तर.

समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना ‘सकाळ’ने कायमच जोडून घेतले आहे. स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीबरोबर त्यांच्यात आत्मविश्‍वास जागवणारे आणि नवे नेतृत्व घडवणारे तनिष्का अभियान, तरुण मुला-मुलींमध्ये समाजाविषयीची आस्था जागवतानाच त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास करणारे, त्यांच्या भावी वाटचालीसाठी आवश्‍यक असणाऱ्या कौशल्यांचा विचार, विकास करणारे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कने (यिन), समाजातल्या सामान्यातल्या सामान्य घटकालाही जोडून घेणारे महान राष्ट्र नेटवर्क, ज्येष्ठ नागरिकांशी जोडले जाणारे ‘सिम्पल’ नेटवर्क अशा विविध उपक्रमांद्वारा ‘सकाळ’ने समाजाच्या प्रत्येक घटकाशी नाते जोडले आहे. समाजातल्या सर्व थरांतल्या वाचकांचा विश्‍वास हेच ‘सकाळ’चे बळ. हे बळ प्रसंगी चांगल्या व्यक्तींच्या, संस्थांच्या मागे उभे करून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्यासाठी एक संजीवनी निर्माण करावी, असे ‘सकाळ’ला नेहमीच वाटते. याच भावनेतून ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’, ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’, ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ द्वारा समाजाला मदत करण्याच्या दिशेने ‘सकाळ’ सातत्याने प्रयत्नशील आहे. याच भावनेने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत काही मदत करावी, असे ‘सकाळ’ला वाटते. हा केवळ एक प्रयत्न आहे. सर्व कायदे, न्यायालयीन प्रक्रिया, गुंतवणूकदारांचे हित आणि सामाजिक नीतिमत्तेच्या चौकटींमध्ये राहून ‘सकाळ’ हा प्रयत्न करू इच्छितो. यातून काय मार्ग निघेल, हे आज सांगता येणार नाही. मदत करू इच्छिणाऱ्या समाजातल्या काही जबाबदार घटकांना सोबत घेऊन हा प्रयत्न ‘सकाळ’ करील, एवढेच आज  म्हणता येईल. 

यासाठी ‘सकाळ’ने उद्योग, वित्त, बॅंकिंग, कायदा, प्रशासन क्षेत्रांबरोबरच सामाजिक कामांमध्ये सक्रीय असणाऱ्या लोकांची एक समिती तयार केली आहे. या समितीमध्ये ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, ॲड. नंदू फडके, ॲड. मनोज वाडेकर, एचडीएफसी रिॲलिटीचे अमित जोशी, अमर बिल्डर्सचे अमर मांजरेकर यांच्यासह अन्य तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती डी. एस. कुलकर्णी यांचे सगळे व्यवहार समजावून घेऊन, प्राप्त परिस्थितीत त्यांना कोणत्या पद्धतीने आधार देता येईल; त्यांच्या गुंतवणूकदारांचे, डीएसके समूहातील कर्मचाऱ्यांचे आणि डीएसके समूहाचेही हित जपले जाईल असा सर्वोत्तम मार्ग काय असेल याचा विचार करून या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काही दिशा सुचवण्याचा प्रयत्न करील. कष्ट आणि सचोटीच्या पायावर उभा राहिलेला उद्योग टिकावा, असे ‘सकाळ’ला वाटते, म्हणून ‘सकाळ’ने हा प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. 

व्यवसाय करत असताना काही जोखीम घ्यावी लागत असते, हे आपण सर्वचजण जाणतो. ही जोखीम घेत असताना व्यवसायातल्या चढउतारांना सामोरे जावे लागते. अडचणीत आणणाऱ्या आपल्या एखाद्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची आणि त्यातूनही पुन्हा सावरण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची संबंधितांची तयारी असेल तर समाजाने त्यांना संधी द्यावी असे ‘सकाळ’ला वाटते. डी.एस. कुलकर्णी यांनीही त्यांची भूमिका सोबत मांडली आहे. या परिस्थितीत आजवर चांगली कामगिरी केलेल्या या उद्योगसमूहाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी समूहाच्या सध्याच्या परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन समजूतदारपणे एक प्रयत्न व्हावा, या मुद्‌द्‌यावर  दुमत असू नये. इथे पुन्हा एक गोष्ट स्पष्ट आवर्जून अधोरेखित करावीशी वाटते, ‘सकाळ’ व ‘सकाळ’बरोबर काम करणारे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ यांची भूमिका पुढाकार घेऊन डीएसके समूह, त्यात गुंतवणूक करणारे सर्व गुंतवणूकदार आणि अन्य संबंधित घटकांचे हित जपणारा काही मार्ग शोधण्यापुरतीच मर्यादित आहे. ‘सकाळ’ने, ‘सकाळ’शी संबंधित कोणाही व्यक्तीने किंवा कोणाही तज्ज्ञाने डीएसके समूहाच्या आर्थिक किंवा अन्य कोणत्याही व्यवहाराची जबाबदारी घेतलेली नाही. किंवा या आधीच्या वा या नंतरच्या कोणत्याही निर्णयाला किंवा व्यवहारालाही ‘सकाळ’, ‘सकाळ’शी संबंधित कोणीही व्यक्ती किंवा कोणीही तज्ज्ञ जबाबदार असणार नाहीत. ‘सकाळ’ किंवा या प्रयत्नांशी संबंधित असणारे  कोणीही याबाबत कोणताही पत्रव्यवहार, जाहीर वा व्यक्तिगत चर्चा, प्रश्‍नोत्तरे करणार नाहीत. या प्रयत्नांना यश यावे असे ‘सकाळ’ला मनापासून वाटते. आपल्यालाही असे वाटत असेल तर आपणही आपल्या सदिच्छा डीएसके समूहाच्यामागे उभ्या करू शकता. फार नाही, पण या संदर्भात समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचाराबाबत आपल्यापैकी काही जण जरी बोलू लागले, तरी तीही मोठी मदत ठरेल. सगळी विघ्ने दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याचा उत्सव सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातला एक चांगला उद्योगसमूह आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्वांवरचे हे विघ्नही दूर करण्यासाठी समाजरूपी विघ्नहर्त्याचे पाठबळ मिळावे, आणि केवळ डीएसके समूहालाच नव्हे; तर भविष्यात उद्योग-व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला त्यातून नवसंजीवनी मिळावी अशीच ‘सकाळ’ची 
अपेक्षा आहे.

Web Title: pune news sakal Social YIN