... अन्‌ तरुणाईने प्रेम व्यक्त केले

मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर) - ‘सकाळ’ने आयोजिलेल्या कार्यक्रमात कविता सादर करणाऱ्या तरुणीसह  अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर.
मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर) - ‘सकाळ’ने आयोजिलेल्या कार्यक्रमात कविता सादर करणाऱ्या तरुणीसह अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर.

पुणे - आज प्रत्येकजण कॉलेजच्या कट्ट्यावर प्रेमाबद्दल बोलत होता... कोणी कवितेतून व्यक्त होत होता, तर कोणी शायरीतून... कोणी स्वप्नांमधील तिच्याबद्दल बोलके झाले, तर कोणी प्रेमाच्या भावनेला मोकळी वाट करून दिली... ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ‘सकाळ’ने शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजिलेल्या कार्यक्रमात तरुणाईने प्रेमाची भावना अलगद मोकळी केली. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने तरुणाईशी संवाद साधत त्यांच्या मनातील ‘तो’ व ‘ती’बद्दल जाणून घेतले. ज्ञानदाने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत कोणी कवितेतून तर कोणी थेट प्रपोज करत आपले प्रेम व्यक्त केले.

महाविद्यालयीन तरुणाईचा ‘व्हॅलेंटाइन डे’ खास करण्यासाठी ‘सकाळ’ने विशेष कार्यक्रम आयोजिला होता. ज्ञानदाने थेट महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये जाऊन तरुणाईशी मनसोक्त गप्पा मारण्यासह त्यांचे मतही जाणून घेतले. या वेळी तरुणाईने जल्लोष करत ज्ञानदासमवेत वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा केला. सर्वांत पहिल्यांदा महाविद्यालयातील एका तरुणीने ‘अन्‌ तुझी साथ हवी...’

 ही कविता सादर करून आपल्या स्वप्नातील ‘त्या’विषयीच्या भावना मांडल्या. तिची ही कविता ऐकताच कॅम्पसमध्ये तरुण-तरुणींची मोठी गर्दी झाली आणि एक-एक करून प्रत्येकजण ज्ञानदाशी संवाद साधत प्रेमाबद्दल बोलका होत गेला. कोणी ‘व्हॅलेंटाइन डे’ का साजरा करावा, यावर बिनधास्त मते मांडत होते तर कोणी ‘सिंगल स्टेट्‌स’ मिरवणाऱ्यांवर शायरी सादर केली.

काहींनी प्रेमाला अंधश्रद्धेची उपमा दिली तर कोणी व्हॉट्‌सॲपवर ‘व्हॉइस मॅसेज’ पाठवून आपल्या व्हॅलेंटाइनला शुभेच्छा दिल्या. एक-एक करून सादर होणाऱ्या कवितांना, गाण्यांना आणि बोलक्‍या संवादाला तरुणाईच्या टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. एका जोडप्याने तर चक्क सर्व महाविद्यालयासमोर एकमेकांना प्रपोजही केले. त्याने केलेल्या प्रपोजला तिने होकार दिला अन्‌ महाविद्यालयात एकच कल्ला झाला. ज्ञानदाच्या मनमोकळ्या संवादाने मॉडर्नच्या तरुणाईचा व्हॅलेंटाइन डे खास बनला. ज्ञानदाने विचारलेले मजेशीर प्रश्‍न अन्‌ तरुणांची भन्नाट उत्तरे असे समीकरण या वेळी रंगले होते. फुलं हे उद्यानात बहरतील का? या कवितेने तर तरुणाईची दाद मिळवली.

ज्ञानदा म्हणाली, ‘‘आपण प्रेम करायलाच हवे. प्रेम ही एक वेगळीच भावना आहे. प्रेम हे फक्त प्रेयसी किंवा प्रियकरापुरते मर्यादित नसते तर प्रेम हे आई-वडील आणि मित्रांवरही असू शकते. प्रेमात पडलात तर प्रेम निभावण्याची ताकद ठेवा. प्रेम हे कोणावरही करा. पण, प्रेमाचा आदर ठेवा.’’ या वेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com