'नापासांमध्ये शिकण्याची नवी उमेद निर्माण करा'

'नापासांमध्ये शिकण्याची नवी उमेद निर्माण करा'

पुणे - ""मोबाईल, इंटरनेट, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे सरकारचे धोरण आणि पालक-पाल्यात हरपलेला संवाद अशा कित्येक कारणांमुळे मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी मुले नापास होतात. हे चित्र बदलले पाहिजे. नापास झाला म्हणून पाल्य गुन्हेगार होत नाही. त्यामुळे पाल्याला टोमणे मारण्यापेक्षा त्याच्यात पुन्हा शिकण्याची नवी उमेद निर्माण करणे आवश्‍यक आहे. नापास झालेला विद्यार्थीही उत्तम प्रकारे पुन्हा शिकू शकतो हा आत्मविश्‍वास त्यांच्यात जागृत करावा,''असे मत "तेजस विद्यालया'च्या संस्थापिका प्रा. विदुला शेटे यांनी रविवारी व्यक्त केले. 

"सकाळ विद्या', "सकाळ सोशल फाउंडेशन' व "तेजस विद्यालय'तर्फे सहावी ते नववीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना व अकरावी नापासांना नवीन संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित मार्गदर्शन चर्चासत्रात त्या बोलत होत्या. हेमलकसाच्या लोकबिरादरीचे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे, प्रा. शशिकांत शेटे आणि उपप्राचार्या प्रियांका कुलकर्णी यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. शेटे आणि कुलकर्णी यांनी नापास मुलांसाठी विद्यालयात चालविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. 

प्रा. शेटे म्हणाल्या, ""तेजस विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 25 वर्षांपासून नापास झालेल्या मुलांमध्ये पुन्हा शिकण्याची उमेद जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला यश मिळत आहे. आम्ही विद्यालयात मुलांना अवघड अभ्यास सोपा करून शिकवतो. त्यांच्यात एक शिकण्याची नवी उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विद्यालयात पुन्हा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या लोकांची कमतरता नाही. पुन्हा शिकायला वयाचे बंधन नसते. मनात जिद्द असेल, तर प्रत्येक वाटेवर यश मिळते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती किमान दहावी शिकलेला असावा हा उद्देश घेऊनच विद्यालय काम करत आहे.'' 

कुलकर्णी म्हणाल्या, ""नापास झाल्यामुळे त्यांच्यात निराशा येते. ते आत्मविश्‍वास गमावतात. नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या टोमण्यांमुळे हे घडते. पालकांनी अशावेळी मुलांची साथ सोडू नये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. नापास झालेला विद्यार्थी पुन्हा परीक्षा दिल्यानंतर विविध क्षेत्रांत काम करू शकतो. पाचवी पास असणाऱ्यांना दहावीची परीक्षा देता येते आणि दहावी पास असणाऱ्यांना बारावीची परीक्षा देता येते.'' 

आमटे म्हणाले, ""शिक्षण हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. हाच विचार घेऊन आज दुर्गम भागातील आदिवासी लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही काम करत आहोत. आज सरकारच्या अनेक योजना नागरिकांपर्यंत पोचत नाहीत. मग अशावेळी विकासाला मर्यादा येतात. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने शिकले पाहिजे. नापास झालो म्हणून काम झाले. निराश होण्यापेक्षा पुन्हा शिक्षणाची वाट शोधावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com