दबावामुळेच दिल्लीचे निमंत्रण रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे झाले तर विचारवंतांच्या हत्या, पुरस्कार वापसी, वाढती असहिष्णुता हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले असते आणि राजधानीत जे मुद्दे चर्चिले जातात ते देशभर गाजतात, या गोष्टींचा बारकाईने विचार करून आयत्यावेळी राजकीय व्यक्तींनी दिल्लीचे स्थळ मागे घेण्यास भाग पाडले, अशी आश्‍चर्यकारक माहिती समोर आली आहे.

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे झाले तर विचारवंतांच्या हत्या, पुरस्कार वापसी, वाढती असहिष्णुता हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले असते आणि राजधानीत जे मुद्दे चर्चिले जातात ते देशभर गाजतात, या गोष्टींचा बारकाईने विचार करून आयत्यावेळी राजकीय व्यक्तींनी दिल्लीचे स्थळ मागे घेण्यास भाग पाडले, अशी आश्‍चर्यकारक माहिती समोर आली आहे.

आगामी साहित्य संमेलनासाठी दिल्ली, बडोदा आणि बुलडाणा येथून निमंत्रण आले होते; पण महामंडळाचे अनेक पदाधिकारी दिल्लीच्या बाजूने होते. त्यामुळे दिल्लीतच संमेलन होणार, अशी चर्चा गेले काही महिने सुरू होती. दिल्ली मराठी प्रतिष्ठानने चार महिन्यापूर्वीच महामंडळाकडे निमंत्रण पाठवले होते. त्यांनी संमेलनाचीच नव्हे तर संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षपदी कोण असावा, याचीही पडद्यामागे पूर्ण तयारी केली होती. दिल्लीतील बरेच महाराष्ट्रीयन प्रशासकीय अधिकारी संमेलनाच्या तयारीत गुंतले होते. इतकी सगळी तयारी झाल्यानंतर महामंडळाचे स्थळ जाहीर होण्याआधी अचानक दिल्लीतील आयोजकांतर्फे एक पत्र आले, तेही ‘व्हॉट्‌सॲप’वरुन. ‘आम्ही आमचे निमंत्रण मागे घेत आहोत’, असे त्यांनी महामंडळाला कळवले. त्यामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

इतकी सगळी तयारी केल्यानंतर आयत्यावेळी दिल्लीतील आयोजक संस्थेने निमंत्रण मागे का घेतले?, अशी चर्चा सांस्कृतिक क्षेत्रात रंगली आहे. संमेलन दिल्लीत घेतले तर सरकारच्या विरोधात अनेक लेखकांनी संमेलनात भूमिका मांडल्या असत्या. हे नकारात्मक चित्र दिल्लीत तयार होऊ नये म्हणून दिल्लीतील काही ‘जाणकार’ राजकीय नेत्यांनी आयोजक संस्थेला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्थळ मागे घेण्यास लावले, अशी माहिती साहित्य महामंडळातील सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. दरम्यान, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘निमंत्रण मागे का घेत आहोत, हे दिल्लीतील संस्थेने पत्रात नमूद केलेले नाही; पण संमेलन दिल्लीत व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती.’’

महामंडळात दोन गट
दिल्लीचे स्थळ रद्द झाल्यामुळे बडोदा आणि बुलडाणा ही दोनच स्थळे शिल्लक होती. महामंडळाचा एक गट बडोद्यावर ठाम होता; पण हे स्थळ मंजूर झाले नाही म्हणून काही संस्थांना हाताशी धरून बुलडाण्याच्या स्थळावरून सध्या राजकारण केले जात आहे, अशीही एक चर्चा महामंडळाच्या वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र धार्मिक पार्श्‍वभूमी असलेल्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी सूचना महामंडळातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आधीच महामंडळातील इतर पदाधिकाऱ्यांनी दिली होती. हेही आता सांगितले जात आहे.

Web Title: pune news sakal vishesh Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan