संभाजी उद्यानात ‘जलवैभव’

संभाजी उद्यानात ‘जलवैभव’

पुणे - तुम्ही जणू काही अथांग सागराच्या तळाशी पोचलेले असता अन्‌ तुमच्या चारही बाजूंना असलेल्या पाण्यात बहुरंगी मासे सुळकन इकडून तिकडे जाताना तुम्ही पाहता नि या जलवैभवानं थक्क होता... यासाठी तुम्हाला समुद्रात जायची गरज नाही; तर चक्क पुण्याच्या संभाजी उद्यानातील मत्स्यालयात तुम्हाला हा अनुभव घेता येणार आहे. ऐन दिवाळीत पुणेकरांना महापालिकेने दिलेली ही भेट ठरणार आहे.

संभाजी उद्यानात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ असणाऱ्या मत्स्यालयाचे नवे रूप आता लवकरच पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. लाल, पिवळे, निळे, सोनेरी अशा बहुरंगी माशांचे विलोभनीय दर्शन लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यापूर्वी मत्स्यालयात गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यातील २० ते २५ प्रकारचे सुमारे साडेचारशे मासे होते. परंतु आता जवळपास ३० प्रजातींचे ५०० ते ६०० मासे मत्स्यालयात पाहायला मिळणार आहेत. उद्यानातील मत्स्यालय १ ऑगस्ट १९५३ रोजी सुरू झाले. सुरवातीला मत्स्यालयात लोखंडी टाक्‍यांमध्ये मासे ठेवले जात होते. या टाक्‍यांना एका बाजूने डांबर लावलेले असायचे. या मत्स्यालयाचे १९९४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. त्या वेळी एका बाजूला काच आणि इतर बाजूंनी सिमेंटचा हौद अशी रचना करण्यात आली. मात्र, या हौदात काही ठिकाणी गळती होऊ लागल्याने मत्स्यालयाचे २००४ मध्ये पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आले. आतापर्यंत मत्स्यालयात ‘फिश टॅंक’प्रमाणे काच असणाऱ्या टाक्‍या आहेत.

जुन्या मत्स्यालयाच्या मागील बाजूला ‘रेन फॉरेस्ट’चा अनुभव देणारे स्वतंत्र मत्स्यालय साकारण्यात आले आहे. मत्स्यालयात साधारणतः २२ ते २४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती आर्किटेक्‍ट इंदरजित सिंग बन्सल यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पर्यवेक्षक अभय कौलगुड म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मत्स्यालयात आणखी मासे असावेत, मासे आणखी सुटसुटीत पद्धतीने दिसावेत, अशी मागणी पुणेकर करत होते. तसेच पुण्यातही आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे मत्स्यालय असावे, या हेतूने त्याचे विस्तारीकरण करण्याचे ठरविले. त्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेकडे पाठविण्यात आला. त्याप्रमाणे अर्ध्या गुंठ्यावरून आता एक गुंठ्यापर्यंत मत्स्यालय विस्तारले आहे.’’

तिकीट दरवाढीचा प्रस्ताव
मत्स्यालयाला भेट देण्यासाठी यापूर्वी लहान मुलांसाठी एक रुपया, तर प्रौढांसाठी दोन रुपये असा तिकीटदर होता. आता मत्स्यालयात काळानुरूप बदल केल्यामुळे तिकिटाचे दरही वाढवावेत, असा प्रस्ताव मत्स्यालयातील अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिला आहे. या प्रस्तावानुसार लहान मुलांसाठी १० रुपये, तर प्रौढांसाठी २० रुपये, असा दर आकारण्याची सूचना आहे, असे अभय कौलगुड यांनी सांगितले.

मत्स्यालयाची वैशिष्ट्ये
‘रेन फॉरेस्ट’चा अनुभव देणारे मत्स्यालय मंगळवारपासून (ता. १७) होणार खुले
मत्स्यालयात एकूण ११ टाक्‍या
नखाइतक्‍या माशापासून दोन फुटांपर्यंतचे मासे 
गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यातील मासे
३० प्रजातींचे जवळपास ५०० ते ६०० बहुरंगी मासे
जुन्या आणि नव्या मत्स्यालयाचा दुग्धशर्करा योग

हे मासे पाहायला मिळतील
गेल्या नऊ वर्षांपासून मत्स्यालयात असणारा जायंट गौरामी हा तब्बल दोन फुटी मासा 
आरवाना, ॲलिगेटर गार, गोल्ड फिश, कॉमन टायगर शार्क, फ्लॉवर हॉर्न, डिसकस, रेड पॅरेट, बार्ब, ब्ल्यू मार्स, ब्ल्यू गौरामी, डॅनीसोनी, कोईकार, कॅट फिश, मोनो एंजल, ऑरेंज क्रोमल असे नानाविध प्रकारचे मासे

मत्स्यालय पाहण्याची वेळ 
 सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत
 सायंकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत
 सणाच्या दिवशी पूर्ण दिवस खुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com