'ज्यायला, हा मुंबईकर म्हणजे...' या व्हिडिओला चार लाख 'व्ह्यूज'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे: त्या दिवशी मला व्हॉट्‌सऍपवर एक मेसेज आला... "नमस्कार! मी राहातो दुबईला, पण मूळचा आहे मुंबईचा. मी हा व्हिडिओ पाहिला आणि मला रडू कोसळले. या कवितेतून तुम्ही मांडलेली मुंबईकरांची व्यथा म्हणजे वास्तव आहे हो; मुंबईकरसुद्धा माणूस आहे, तो सुपरमॅन नाही हो..!'

पुणे: त्या दिवशी मला व्हॉट्‌सऍपवर एक मेसेज आला... "नमस्कार! मी राहातो दुबईला, पण मूळचा आहे मुंबईचा. मी हा व्हिडिओ पाहिला आणि मला रडू कोसळले. या कवितेतून तुम्ही मांडलेली मुंबईकरांची व्यथा म्हणजे वास्तव आहे हो; मुंबईकरसुद्धा माणूस आहे, तो सुपरमॅन नाही हो..!'

"सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे उपसंपादक, तसेच लेखक-व्याख्याते संदीप चव्हाण यांनी "ज्यायला, हा मुंबईकर म्हणजे सुपरमॅन वाटला काय तुम्हाला...' या कवितेचे लेखन करून तिला आवाजही दिला आहे. या कवितेचा व्हिडिओ तयार करून एका पुणेकराने मुंबईकरांच्या जगण्याचे वास्तव समजावून घेत त्यांच्या अंतरीची उलाघाल, घालमेल, तळमळ जगासमोर मांडण्याचा केलेला हा प्रयत्न मुंबईकरांना भावला आहे. जीवन नारखेडे (इंदापूर, ता. माणगाव, जि. रायगड) यांनी या व्हिडिओची तांत्रिक बाजू सांभाळली असून, या कवितेला दृश्‍यरूप देऊन तिला खऱ्या अर्थाने जिवंत केले आहे. "मिनिटा-मिनिटाचा हिशेब पाळणारा हा मुंबईकर सेकंदा-सेकंदाला मात्र त्याच्या कळत-नकळत मृत्यूशी झगडत असतो; परंतु स्फोट, पूर, अपघात आदी विविध संकटं सोसूनही त्याला काय ऐकायला मिळतं... "मुंबईकरांचं स्पिरीट बाकी काय..!' वर्षानुवर्षे हा "स्पिरीट' नावाचा शब्द उगाळून मुंबईकरांच्या समस्या, त्यांचे दु:ख आपण कुठवर बाजूला सारायचे?

या मुंबईकरांकडे केवळ बघे म्हणून का बघत बसायचे? आपण आपल्या हृदयात स्थान दिलेल्यांना जिवापाड जपतो ना; मग मुंबई जर महाराष्ट्राचं हृदय असेल, तर या मुंबईरूपी हृदयात राहणाऱ्या मुंबईकरांना आपण जिवापाड जपायला नको का? मुंबईकर आमचे आहेत आणि आम्ही मुंबईकरांचे आहोत हा मानवता धर्म आपण सर्वांनीच पाळायला नको का,'' अशी प्रतिक्रिया संदीप चव्हाण यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

"ज्यायला, हा मुंबईकर म्हणजे...'
"ज्यायला, हा मुंबईकर म्हणजे सुपरमॅन वाटला काय तुम्हाला...' हा मुंबईकरांची रोजच्या जगण्याची धडपड मांडणाऱ्या कवितेचा व्हिडिओ "सकाळ'च्या फेसबुक पेजवरून 5 ऑक्‍टोबर रोजी व्हायरल झाला होता. अवघ्या चार दिवसांत या व्हिडिओला चार लाखांवर "व्ह्यूज' मिळाले होते. एक दोन नव्हे, तर हजारो मेसेज, कॉमेंट्‌स मुंबईसह देश-विदेशातून या व्हिडिओला लाभल्या आहेत.

सलाम तुमच्या हिमतीला
सलाम तुमच्या प्रीतीला...
मुंबईकरांनो, सलाम तुमच्या
एकदिलाने जगण्याला...!
- संदीप चव्हाण, पुणे

Web Title: pune news sandeep chavan mumbai video news