डासांच्या त्रासाने सांगवीकर त्रस्त; अखेर जलपर्णी काढण्यास सुरूवात

juni-sangvi
juni-sangvi

जुनी सांगवी - जलपर्णी आणी डास संपुर्ण शहराबरोबरच जुनी सांगवीकरांच कायमचं दुखणं बनलं आहे. गेल्या अनेक वर्षापासुन जलपर्णी हा विषय केवळ ठेकेदार पोसणे आणी जलपर्णीचे निवडणुकीत राजकारण करणे या पलिकडे गेल्याचे सांगवीकरांनी अजुन तरी अनुभवलेले नाही. मुळा व पवना या दोन्ही नद्यांच्या संगमावर वसलेल्या जुनीसांगवीकरांना वाढत्या उकाड्यासोबतच डासांच्या चावण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दोन दशकापासुन नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे पालिका जलपर्णी काढण्याच्या निविदा काढते मात्र पावसाळा तोंडावर येईपर्यंत किती काम केले जाते हे सर्वश्रुत आहे.नेहमी प्रमाणे ठेकेदार पावसाळ्याची वाट पाहतात. पावसाळा तोंडावर आला की जलपर्णी हटवण्यासाठी प्रशासन व ठेकेदारांकडुन काम केल्याचा दिखावा केला जातो. आणी पावसाच्या पाण्यात जलपर्णी वाहुन जाण्याबरोबर यांचही घोडं मुळा पवनाच्या जलात वाहुन निघतं. हे गेली दोन दशकांपासुन जुनी सांगवीकर अनुभवताहेत. जुनी सांगवीच्या सत्तांतरास निवडणुक काळात जलपर्णीचा मुद्दाही प्रभावी ठरला.अनेकांनी सांगवी डासमुक्त करण्याच्या वल्गना करून मते मिळवली. वर्षपुर्तीही झाली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडुन यावर रामबाण इलाज होत नाही.

पालिका प्रशासनाकडुन जलपर्णी हटविण्याकामी प्रत्यक्षात सुरूवात होत नसल्याने पर्यावरण प्रेमी मंडळीकडुन पवना नदीपात्रातील जलपर्णी हटविण्याचे काम मंगळवारपासुन सुरू करण्यात आले आहे. रोटरी क्लब व ईतर सहभागी संस्थेचे कार्यकर्ते दोर व रोपच्या साह्याने जलपर्णी नदीपात्राच्या बाहेर काढण्याचे काम करत आहेत.मात्र ईतर साधनं उपलब्ध नसल्याने त्यांचे प्रयत्नही कमी पडत आहेत. या जलपर्णी हटाव मोहिमेत एकुण पन्नासजण  काम करत आहेत.एकीकडे प्रशासनाने मात्र बघ्याची भुमिका घेतलेली दिसुन येते.याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा,केल्यास निविदा काढलेल्या आहेत.मुख्यालयाकडुन आदेश देण्यात आलेले आहेत.यापलिकडे उत्तर मिळत नाहीत.प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे तक्रार मागणी करूनही वैतागलेल्या कार्यकर्त्यांनी अखेर जमेल तसे जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.

सत्तांतरानंतर या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना अमलात यावी अशी सुज्ञ सांगवीकर नागरीकांची माफक अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींनीही पालिका प्रशासनाच्या  आरोग्य विभागाकडे जलपर्णी हटविण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. नुकतेच जुनी सांगवी प्रभागाच्या चारही नगरसेवकांनी पवना व मुळा नदीपात्रातील जलपर्णी हटविण्याबाबत आरोग्य विभागास निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, सांगवी नवी सांगवी प्रभाग क्रं ३२ मधील पवना व मुळा नदीपात्रातील जलपर्णी वेगाने वाढत आहे.जलपर्णीच्या विस्तारामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढुन नागरीकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे लागत आहे.ह्या समस्येला वेळीच आळा न घातल्यास साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. तरी याबाबत,आरोग्य विभागाने त्वरीत कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.

 "येत्या दोन दिवसात मुळा नदीपात्रातील जलपर्णी यांत्रीक बोटीद्वारे काढण्याच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे.याचबरोबर पवना नदीपात्रातील जलपर्णी मनुष्यबळाद्वारे येत्या दोन दिवसात काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे''

- ज्ञानेश्वर सासवडकर "ह "प्रभाग आरोग्य अधिकारी

नागरीक म्हणतात:

गेली अनेक वर्षापासुन सांगवीकरांची ही समस्या आहे. डासांच्या वाढत्या प्रमाणेमुळे घराबाहेर थांबणे,फिरणे,मुश्कील झाले आहे. तर घराची दारे,खिडक्या दिवसभर बंद करावी लागतात.रात्री मच्छर चावु नयेत म्हणुन नानाविध प्रकारच्या मच्छर अगरबत्ती, धुप याचा वापर करावा लागतो.यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भिती आहे.

- सुजाता निकाळजे गृहिणी.


"निवडणूक काळात चमकोगिरी करणारे, स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवुन घेणारे आता या कामात पुढे येताना दिसत नाहीत.

- संजय गायकवाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com