साठ लाखांवर डल्ल्याचा कंत्राटदारांचा डाव

ज्ञानेश सावंत 
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

या योजनेअंतर्गत नॅपकिन जमा केले जात आहेत. त्याचा अहवालही मागविला जातो. त्यानुसार संबंधित ठेकेदाराला महिन्याकाठी बिले दिली जातात; मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती देण्यात आली नाहीत. त्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यावर बिले देण्यात येतील.
- सुधीर चव्हाण, कार्यकारी अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

पुणे - सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालय आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी जमा होणाऱ्या ‘सॅनिटरी नॅपकिन’ची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन हे ‘नॅपकिन’ जमा करण्याची योजना आखली. ते जमा न करताच ठेकेदार लाखो रुपये लाटत असल्याचे महापालिकेच्याच निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात अमुक एवढे काम केल्याचे भासवून बिल घेण्याचा खटाटोप सुरू केल्याचे उघड होताच, ‘काम केल्याचे पुरावे द्या, मग बिल घ्या,’ अशी तंबी महापालिकेतील एका अधिकाऱ्याने ठेकेदाराला दिली, त्यामुळे ६० लाख रुपयांच्या या योजनेचे पितळ उघडे पडले आहे. 

या योजनेसाठी महापालिकेने पहिल्यांदाच सुमारे ६० लाख रुपयांची तरतूद केली असून, योजना प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन केले होते. त्याकरिता ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली. सुरवातीला काही दिवस मोजक्‍याच भागात घरोघरी जाऊन नॅपकिन जमा करण्याचा प्रयत्न झाला. फारसा गाजावाजा न झालेली ही योजना लुबाडणुकीकरताच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सुनावले
कागदोपत्री काम केल्याचे दाखवून बिले घेण्यासाठी ठेकेदाराने संबंधित खात्याकडे फायली सादर केल्या आहेत; मात्र त्याचे स्वरूप पाहून अधिकाऱ्याने आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारे केवळ काम झाले म्हणून बिले देता येणार नाहीत, अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी सुनावले आहे. गेल्या वर्षभरात कामे झाली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच ठेकेदाराचा कारभार उघडा पडला आहे.

६० लाख रुपयांची महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद
 सुरवातीला काही दिवस मोजक्‍याच भागात घरोघरी जाऊन नॅपकिन जमा करण्याचा प्रयत्न
 काही ठिकाणी यंत्रणाही उभारली आहे. तेथे नॅपकिन गोळा होतात; पण उचलले जात नाहीत

जागोजागी ‘सॅनिटरी नॅपकिन’ गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. ते जमा करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे, असा थातूरमातूर खुलासा महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याने केला. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यात सॅनिटरी नॅपकिनचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. मात्र, त्यातील घटक अपायकारक असल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे नॅपकिन गोळा करण्यास कामगारांनी विरोध केला होता. 

या पार्श्‍वभूमीवर सॅनिटरी नॅपकिन जमा करण्यासाठी जानेवारी २०१७ पासून महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र योजना आखली आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन नॅपकिन गोळा करण्याचे नियोजन आहे. तर, शाळा, महाविद्यालये, कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी जमा होणारे ‘नॅपकिन’ एकत्रित करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. 

येथील नॅपकिन जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध भागांत सात केंद्रेही सुरू केली आहेत. परंतु, या केंद्रांच्या माध्यमातून नेमक्‍या किती नॅपकिनवर प्रक्रिया केली, ते कोणत्या भागातून जमा केले, याचा तपशीलही अधिकाऱ्यांना मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: pune news sanitary napkin scheme issue