सॅनिटरी पॅड मोफत वाटपाची व्यवस्था व्हावी - अक्षय कुमार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - 'सद्यपरिस्थितीत देशातील 82 टक्के महिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड्‌स वापरत नाहीत. मासिक पाळी ही निषिद्ध गोष्ट नाही, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे सरकारने सॅनिटरी पॅडवर करसवलत देण्याऐवजी पॅडच्या मोफत वाटपाची व्यवस्था केली पाहिजे,'' असे मत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी व्यक्त केले.

पुणे - 'सद्यपरिस्थितीत देशातील 82 टक्के महिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड्‌स वापरत नाहीत. मासिक पाळी ही निषिद्ध गोष्ट नाही, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे सरकारने सॅनिटरी पॅडवर करसवलत देण्याऐवजी पॅडच्या मोफत वाटपाची व्यवस्था केली पाहिजे,'' असे मत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया ऍण्ड कम्युनिकेशन (एसआयएमसी) यांच्यावतीने आयोजित "सिनेमा : समाज व सांस्कृतिक प्रबोधनाचे एक माध्यम' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. सिंबायोसिस विश्वविद्यालयाच्या (अभिमत विद्यापीठ) उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, झांबियाच्या राजदूत जैनबा जॅग्ने, डॉ. रुचा जग्गी आदी उपस्थित होते. मगरपट्टा येथे सिनेपोलिस चित्रपटगृहाच्या आवारात "व्हर्च्युअल रिऍलिटी गेम लाउंज'चे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. या वेळी "मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट कंपनी'चे सतीश मगर, सिनेपोलिस इंडियाचे संचालक देवांग संपत आणि सिनेपोलिस एशियाचे व्यवस्थापकीय संचालक झेव्हियर सोतोमेयर उपस्थित होते.

कुमार म्हणाले, 'पूर्वी मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वयंपाकघरात प्रवेश दिला जात नसे. महिलांना आराम मिळवा हा त्यामागील उद्देश होता. कालांतराने मासिक पाळीला निषिद्ध मानून महिलांना स्वयंपाकघर आणि देवदेवतांपासून दूर ठेवण्याची पद्धत प्रचलित झाली. ही पद्धत मोडीत काढून सांस्कृतिक परिवर्तन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केंद्र सरकार आपल्यासाठी काही करेल, याची आपण प्रतीक्षा न करता आपणच बदल घडवूयात.''

जॅग्ने म्हणाले, 'मासिक पाळी हा विषय केवळ भारतामध्येच गंभीर नाही, तर जगभरात त्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. या विषयावर जगभरातच लोकशिक्षणाची गरज आहे. मासिक पाळी निषिद्ध नाही, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिलांना मासिक पाळी आली नसती, तर कोणाचाही जन्म झाला नसता.''

डॉ. जग्गी म्हणाल्या, 'चित्रपटसृष्टीतील मुख्य प्रवाहातील कलाकार मासिक पाळी या विषयावर बोलतो, ते पुरोगामी सिनेमाचे लक्षण आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन आणि समाजप्रबोधन अशा दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत.''

Web Title: pune news sanitary pad free distribution managment