खासदार संजय काकडेंसह चौघांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - न्यू कोपरे गावातील रहिवाशांची जमीन बळकावणे आणि दस्तांमध्ये फेरबदल करून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, काकडे कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे संचालक आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यासह चौघांवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश  दिले होते. 

या संदर्भात दिलीप हरिभाऊ मोरे (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय दत्तात्रेय काकडे (वय 52), सूर्यकांत दत्तात्रेय काकडे (वय 56), अशोक गजानन यादव (वय 50, रा. कर्वेनगर) या तिघांसह "काकडे कन्स्ट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड'वर गुन्हा दाखल केला आहे. 

न्यू कोपरे ग्रामस्थांनी 14 एकर जमीन सूर्यकांत काकडे यांना विकसनासाठी दिली होती. मात्र, जमिनीच्या सातबारा आणि अन्य कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून त्यांनी एकूण 38 एकर जमीन घेतली. त्यातील सात एकर जमीन महापालिकेला मोकळी जागा (ऍमिनिटी स्पेस) म्हणून देण्यात आली होती. 17 एकर जमीन काकडे यांनी बळकावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यातील काही भूखंडांवर बांधकाम झाले आहे, तर काही विकण्यात आले आहेत. 

या प्रकरणात न्यू कोपरे गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. तसेच, दिलीप मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना, शिवाजीनगरच्या प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्या वेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन "काकडे कन्स्ट्रक्‍शन'वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी दिले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव मोळे पुढील तपास करत आहेत. 
दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी जंगली महाराज रस्त्यावरील काकडे यांच्या कार्यालयासमोर अनेकदा आंदोलन केले होते. परंतु, पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले जात होते. दरम्यान, "न्यू कोपरे गावातील कोणाचीही फसवणूक केली नाही,' असा दावा काकडे यांनीदेखील केला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार "काकडे कन्स्ट्रक्‍शन' आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: pune news sanjay kakade crime