प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले "ससून'चे महत्त्वाकांक्षी प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - सरकारी रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. दोन वर्षांपासून पूर्ण झालेल्या कामावर धुळीचे थर बसले असून, येथील विजेची बटणे चोरीला जात आहेत. मात्र याच्या सुरक्षेच्या दृष्टीने दारे-खिडक्‍या लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. 

पुणे - सरकारी रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. दोन वर्षांपासून पूर्ण झालेल्या कामावर धुळीचे थर बसले असून, येथील विजेची बटणे चोरीला जात आहेत. मात्र याच्या सुरक्षेच्या दृष्टीने दारे-खिडक्‍या लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. 

ससून रुग्णालय अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी, येथे येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच अद्ययावत उपकरणांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आणि सरकारी रुग्णालयांची प्रतिमा बदलण्याच्या उद्देशाने अकरा मजली इमारतीचे बांधकाम नऊ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. या दरम्यान इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले, मात्र रेंगाळलेल्या अंतर्गत कामांना गती मिळत नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

दारे-खिडक्‍या अभावी साहित्यांची चोरी 
दोन वर्षांपासून अकरा मजल्यांमधील वॉर्ड, तेथील खोल्यांमध्ये बसविलेल्या टाइल्सवर धुळीचे थर बसले आहेत. पायऱ्यांवर मातीचे ढिगारे आहे. येथील प्रत्येक खोलीत, वॉर्ड आणि स्वच्छतागृहांपर्यंत वीजपुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र वॉर्डला दारे-खिडक्‍या नसल्याने वॉर्डमधील विजेच्या बटणांची चोरी होत असल्याचे दिसून आले आहे. 

का रखडले काम? 
राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे. सुरवातीला इमारतीच्या बांधकामाचे काम वेगाने पूर्ण झाले. अकरा मजली इमारत उभी राहिल्यानंतर इमारतीमधील फर्निचर, दारे-खिडक्‍या, स्वयंपाक घर, रुग्णांना ऑक्‍सिजन देण्याची व्यवस्था अशी कामे रखडली आहेत. ही कामे करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. मात्र यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नाही. त्यामुळे ही टोलेजंग इमारत धूळ खात पडून आहे. 

राजकीय, प्रशासकीय उदासीनता 
अकरा मजली इमारतीच्या बांधकामासाठी 74 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर अंतर्गत कामे, वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी 2016 मध्ये 109 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लागार नियुक्त करणे, त्याचा पाठपुरावा करणे, निविदा प्रक्रिया वेगाने झाल्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेत निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हे काम रखडल्याची माहिती पुढे आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणे आवश्‍यक होते. कामाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती घेऊन त्याला गती मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज होती. पण या आघाडीवरही उदासीनता दिसून आल्याने प्रकल्प रेंगाळल्याचे स्पष्ट होते. 

फक्त तीन कोटी खर्च 
इमारतीसाठी उपलब्ध असलेल्या 80 कोटी रुपयांपैकी अवघे तीन कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षभरात खर्च केल्याचे उघड झाले आहे. 

का झाला नाही, निधीची वापर? 
इमारतीच्या अंतर्गत सुविधांसाठी राज्य सरकारने 109 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नसल्याने या निधीचा पूर्ण वापर झाला नाही. आता ही निविदा प्रक्रिया सुरू झाली तरीही त्यासाठी पुढील तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती यातील जाणकारांनी दिली. 

कधी होईल इमारत पूर्ण? 
रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉक्‍टरांचे डोळे आता ही इमारत कधी पूर्ण होईल, याकडे लागले आहेत. त्या बाबत येथील कामगार, ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधला असा ही इमारत वापरात येण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: pune news sasoon hospital