"सोफोश'मधील चिमुकल्यांना "मातृदूध' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - जगात येऊन जेमतेम काही तासांमध्ये त्याला जन्मदात्यांनी सोडून दिले. सात दिवसांच्या "त्या' चिमुकल्याला "सोफोश' संस्थेमध्ये आणले गेले. दुधाची पावडर हाच त्याचा आतापर्यंतचा आहार होता. ससून रुग्णालयातील मातृदूग्ध पेढीमुळे "त्याला' आज प्रथमच मातेचे दूध मिळाले. 

"सोफोश' संस्थेत दाखल झालेल्या नवजात अनाथ बालकांना मातृदूध देण्याच्या अभिनव उपक्रमाला गुरुवारपासून ससून रुग्णालयात सुरवात झाली. नवजात बालकांसाठी हे मातृदूध "संजीवनी' ठरेल, असा विश्‍वासही येथील बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केला. 

ससून रुग्णालयात सुरू झालेल्या मातृदुग्ध पेढीतून "सोफोश'मधील नवजात बालकांना मातृदूध देण्याच्या उपक्रमाची सुरवात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते करण्यात आली. त्या वेळी बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर, डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. छाया वळवी, डॉ. उदय राजपूत, डॉ. तेजस्विनी काळे, डॉ. साजिली मेहता, परिचारिका वैशाली शेंभरकर, असिफा तांबोळी आणि भारती निघोट आदी उपस्थित होते. "सोफोश'च्या उपाध्यक्ष निर्मला लाहोटी, विश्‍वस्त अमला फाटक, प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद आणि शुभांगी अभ्यंकर या उपक्रमात सहभागी झाल्या. 

ससून रुग्णालयात एक वर्षापासून मातृदुग्ध पेढी सुरू केली आहे. या मातृदुग्ध पेढीत संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया करून ते नवजात अर्भक अतिदक्षता विभागात दाखल मुला-मुलींना दिले जात होते. त्यासाठी ससून रुग्णालयासह महापालिकेच्या काही रुग्णालयांमधील मातांनी दान केलेले दूध वापरले जाते. दूध संकलन चांगल्या प्रमाणात होत असल्याने आता ते "सोफोश'मध्ये दाखल झालेल्या सहा महिन्यांपर्यंतच्या बाळांना उपयुक्त ठरत असल्याची माहिती डॉ. किणीकर यांनी "सकाळ'ला दिली. 

त्या म्हणाल्या, ""व्हॅनमधून महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातून दररोज दूध संकलन केले जाते. ते दूध निर्जंतुकीकरण केल्यानंतर नवजात बालकांना दिले जाते. अशा प्रकारे मोफत दूध देण्याचा हा पहिला प्रयोग केला जात आहे.'' 

डॉ. चंदनवाले म्हणाले, ""सोफोश'मधील अनाथ मुलांना मातेचे दूध मिळाल्याने ससून रुग्णालयात सुरू केलेल्या दूध संकलन व्हॅनचा एक टप्पा यशस्वी पूर्ण झाला आहे. भविष्यात ही सेवा अधिक चांगल्या पद्धतीने पोचविण्यासाठी या उपक्रमात मातांचा सहभाग आवश्‍यक आहे.' 

वयाच्या सहा महिन्यांपर्यंत मातृदूध नवजात बालकांसाठी अत्यावश्‍यक असते; मात्र मातृदूध अतिदक्षता विभागातील बाळांसाठी आणि अनाथ नवजात बाळांसाठी उपलब्ध होत नाही. अशा वेळी खासगी रुग्णालयांमधून ते महागड्या दराने विकत घ्यावे लागते. ही सुविधा आता ससून रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात आली आहे; पण त्यासाठी मातांनी दुग्धदानासाठी पुढे येण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे. 

Web Title: pune news sasoon hospital Orphaned child