ससूनमध्ये अद्ययावत शवागार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - ससून रुग्णालयात अद्ययावत सुविधांनी सुसज्ज शवागार उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच याचे बांधकाम सुरू होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याचे शवागार पाडण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे - ससून रुग्णालयात अद्ययावत सुविधांनी सुसज्ज शवागार उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच याचे बांधकाम सुरू होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याचे शवागार पाडण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 

ससून रुग्णालयात नवीन अकरा मजली इमारत उभारण्यात येत आहे. पुढील वर्षभरात याचे उर्वरित काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. भविष्यात ससून रुग्णालयावरील रुग्णांचा वाढता ताण विचारात घेऊन या नवीन इमारतीची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशस्त प्रवेशद्वार उभारण्याचेही नियोजन आहे. या नियोजित प्रवेशद्वाराजवळ जुने शवागार होणार आहे. त्यामुळे नवीन अकरा मजली इमारतीच्या सौंदर्यास अडथळा निर्माण होत असल्याचे मत वास्तूविशारदांनी व्यक्त केले आहे. त्या आधारावर सध्याचे शवागार पाडण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. मात्र, शवागाराच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार झाला नव्हता. त्याच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरवात झाली नव्हती. या कामांना आता वेग आला आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ससून रुग्णालय उपविभागाच्या अभियंता उज्ज्वला घावटे म्हणाल्या, ""नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता त्याच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या शवागाराचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल. त्यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन शवागाराचा आराखडाही निश्‍चित करण्यात आला आहे.'' 

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ""अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे नवीन शवागार असेल. यात मृतदेह ठेवण्याची क्षमता वाढणार आहेच, पण त्यासाठी दर्जेदार शीतगृह उपलब्ध करण्यात येणार आहे. न्यायवैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. तसेच, मृताच्या नातेवाइकांना बसण्याची व्यवस्थाही येथे केली जाईल.'' 

असे असेल नवीन शवागार 
- शवविच्छेदन टेबलांची संख्या चारवरून दहापर्यंत वाढणार 
- मृतदेह ठेवण्याची क्षमता 32 वरून शंभर होणार 
- पंचनामा कक्ष 
- शवविच्छेदनापूर्वी मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा 
- मृताच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षागृह

Web Title: pune news sasoon hospital sasoon new Mortuary