सासवडच्या खताला 'हरित कंपोस्ट' ब्रँड वापरण्यास शासनाची परवानगी

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 18 जुलै 2017

शेतकऱयांना खतविक्री व पालिकेला सबसिडीही..
पालिकेच्या `हरित कंपोस्ट` ब्रँडच्या या खताची विक्री किलोमागे १ रुपया ८० पैसे या दराने शेतकरी व वितरकांना होईल. विशेष म्हणजे या खताच्या विक्रीवर शासन टनामागे 1,500 रुपये सबसिडी देणार आहे, असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले. 

सासवड : शहरातील कचऱ्यापासून नगरपालिका यंत्रणेकडून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी `हरित कंपोस्ट खत` हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने सासवड नगरपालिकेस परवानगी दिली आहे. राज्यातील फक्त चार नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ता. 19 जुलै रोजी येथील नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व मुख्याधिकारी विनोद जळक यांना पालिकेसाठी खताबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरीत घनकचरा निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्या पासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. या खताची गुणवत्ता तपासून शासनाने सासवड नगरपालिकेची याबाबत निवड केली आहे. खताची गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याधिकारी जळक यांचे प्रयत्न होते. त्यात विज्ञान आश्रम (पाबळ) यांनी मोलाची मदत केली. नगराध्यक्ष भोंडे व मुख्याधिकारी जळक यांनी सांगितले कि., पालिकेने ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली. शहरातील सांडपाणी प्रक्रीयेच्या डिच हौसलगत 1.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री आणि कुंभारवळणला 3.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री बसविली आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया नियमित शहरातच सुरु आहे. 

शहरातील नागरिकांमध्येही याबाबत जागृती केली जातेय. पालिकेने कुंभारवळणला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र सुरु केले आहे. तसेच सध्या शहराचा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो, तेथे कमीत कमी कचरा कसा जाईल., याचे नियोजन केले आहे. याशिवाय हा शहरातील जुना कचरा डेपो हलविण्यासाठी 66 लाख खर्चाची तरतूद झाली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण कचरा हलविला जाईल. शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी शासनाने 3.23 कोटींचा निधी मंजूर केलाय. गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करून तेथेच खत निर्मितीचे प्रात्यक्षिक मुख्याधिकारी जळक हे पदाधिकाऱयांसह घेतातेय. प्लॅस्टिक कचरा विघटनामध्ये मोठा अडथळा असल्याने प्लॅस्टीक बंदी लागू केली आहे., असे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाणांनी सांगितले. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाने खताची पहाणी करून पालिकेस `हरित कंपोस्ट` ब्रँड वापरण्यास परवानगी दिली. याबाबत गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष विजय वढणे व नगरसेवकांनीही समाधान व्यक्त केले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: pune news saswad harit compost brand approved