पोलिसांनी वेशांतर करून पकडली सासवड टेम्पो लुटमारीतील तीनजणांची टोळी

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 19 जुलै 2017

पकडलेल्या आरोपींची नावे अशी : संतोष विठ्ठल धोत्रे (वय ३०), दादा झुंबर पिंपळे (वय ३२) व फिरोझ अब्बास इनामदार (वय २८, सर्व रा. आढळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर). याबाबत त्यावेळी टेम्पो चालक उत्तम आनंदराव चव्हाण (रा. माळेगाव खुर्द ता. बारामती) यांनी सासवडला पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

सासवड : मुंबईहून माळेगाव - बारामतीला निघालेल्या टेम्पो चालकास पिस्तुलाचा धाक दाखवून रात्रीच्या वेळी सासवडनजीक लुटल्याची घटना एक वर्षापूर्वी घडली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी वेशांतर करून पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन चोरट्यांना श्रीगोंदा तालुक्यात जाऊन पकडण्यात आज यश मिळविले. तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.

याबाबत त्यावेळी टेम्पो चालक उत्तम आनंदराव चव्हाण (रा. माळेगाव खुर्द ता. बारामती) यांनी सासवडला पोलिसांकडे फिर्याद दिली होती. याबाबत त्यावेळी टेम्पोचालक उत्तम आनंदराव चव्हाण (रा. माळेगाव खुर्द ता. बारामती) यांनी सासवडला पोलिसांकडे फिर्याद दिली होती. 2 आॅगस्ट 2016 रोजी बारामती मार्केट यार्ड येथून उत्तम चव्हाण हे त्यांच्याकंडील टेम्पोमधून भाजीपाला घेऊन नागपाडा - मुंबई येथे माल खाली करून परत निघाले होते. सोबत रोख रक्कम १,९०,००० रुपये होती.

बारामतीकडे परतताना वारजे माळवाडी पुलालगत दोन इसमांनी टेम्पोला हात करून बारामतीला जायचे, असे खोटे सांगून ते गाडीत बसले. टेम्पो सासवडच्या पुढे वीर फाट्यानजीक पुढे आल्यावर त्यातील एका इसमाने लघवीसाठी टेम्पो थांबवण्यास सांगितला. तो लघवी करून परत टेम्पोत आल्यावर केबिनमधील त्याच्या दुसऱ्या साथीदाराने स्वतःच्या बॅगेतून पिस्तुल काढून टेम्पोचालक चव्हाण यांच्या पोटाला लावून दुसऱ्या इसमाने त्यांचा मोबाईल व डिकीतील रोख रक्कम रुपये १,९०,००० असा एकूण रुपये १ लाख ९१,२०० रुपयांचा एेवज जबरीने काढून घेतला. तसेच कोणाला सांगितले तर जीवे मारू अशी धमकी देऊन दोघे पाठीमागून येणारे कारमध्ये बसून पळून गेले होते. याबाबत चालक चव्हाण यांनी सासवड पोलिस ठाण्यात दिलेलया तक्रारीवरून भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर तक्रारीमध्ये टेम्पो चालकाने आरोपीचे वर्णन व बोली भाषेचा उल्लेख केला होता.
 
दरम्यान, पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशा वर्णनाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे याना खबऱ्यामार्फत वरील वर्णनाचे गुन्हेगार श्रीगोंद्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शाखेचे सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोपट गायकवाड, निलेश कदम, महेश गायकवाड आदींचे पथक वेशांतर करून श्रीगोंद्याकडे गेले. आज ता. 18 रोजी सदर पथकास अशा वर्णनाचे २ इसम आढळगाव (ता.श्रीगोंदा) येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तीन आरोपींना पकडण्यात यश मिळविले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना सासवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले असून त्यांचेकडून आणखीन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे करणार आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pune news saswad robbers arrested after one year