अनधिकृत बांधकामांवर ‘सॅटेलाइट’द्वारे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे - शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी ‘इस्रो’च्या मदतीने सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी शहराचे सूक्ष्म आणि तपशीलवार नकाशे हैदराबाद येथील सॅटेलाइट लॅब (संगणकीय प्रयोगशाळा) मधून महापालिकेने मागविले आहेत. सुमारे दोन महिन्यांत नकाशांनुसार कारवाई करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 

पुणे - शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी ‘इस्रो’च्या मदतीने सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी शहराचे सूक्ष्म आणि तपशीलवार नकाशे हैदराबाद येथील सॅटेलाइट लॅब (संगणकीय प्रयोगशाळा) मधून महापालिकेने मागविले आहेत. सुमारे दोन महिन्यांत नकाशांनुसार कारवाई करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 

शहरात अनधिकृत बांधकामे केव्हा होतात, याची महापालिकेला माहिती मिळत नाही. त्यामुळे अंतर्गत आणि बाह्यस्वरूपी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेला नियंत्रण ठेवता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर किमान बाह्यस्वरूपाची बांधकामे रोखण्यासाठी सॅटेलाइटची मदत घेण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे. आयुक्त कुणाल कुमार अर्थसंकल्प सादर करताना याबाबत सूतोवाच केले होते. शहरातील ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची बांधकामे विकास शुल्क भरून नियमित करण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे; परंतु भविष्यात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठी महापालिकेला लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइटची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी ८ लाख ३८ हजार रुपये महापालिकेने संबंधित प्रयोगशाळेत भरले आहेत. शहरात सध्या सुमारे ८० हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे असल्याचा अंदाज आहे. 

नकाशे महापालिकेला मिळाल्यावर क्षेत्रीय कार्यालयांनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयातील अभियंत्यांवर त्या भौगोलिक क्षेत्रावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येऊ शकते, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पावसाळी गटारांची कामे प्राधान्याने
आर्थिक तरतुदीपुरती कागदोपत्री मांडण्यात येणारी पावसाळी गटारे आता प्रत्यक्ष रस्त्यावर येणार आहेत. शहरातील लोकवस्ती आणि बाजारपेठांमध्ये प्राधान्याने ही कामे होणार आहेत. त्याकरिता आखलेल्या आराखड्याची यंदा पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत बहुतांशी कामे पूर्ण होतील. ज्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही, अशी आशा प्रशासनाला आहे.

शहरात आणि उपनगरांमध्ये केवळ पाचशे किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे आहेत. दोन वर्षांपूर्वी अवेळी पाऊस झाल्याने अनेक रस्ते आणि शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर शहरात पावसाळी गटारे नसल्यानेच अशा घटना घडत असल्याची कबुली महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच, त्या त्या परिसराची पाहणी करून त्याचा आराखडाही तयार केला. त्याकरिता ९३ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. मात्र पावसाळा संपल्यानंतर हा आराखडा तसाच पडून राहिला. ही कामे पुढील चार महिन्यांत केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

Web Title: pune news Satellite Satellite monitoring unauthorized constructions