नागरी सेवा केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा - राव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामध्ये अद्यापही पुणे जिल्ह्यातील 65 हजार शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, केंद्रांवर सोय व्हावी यासाठी "नागरी सुविधा' आणि "आपले सरकार' केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. 

पुणे - राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामध्ये अद्यापही पुणे जिल्ह्यातील 65 हजार शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, केंद्रांवर सोय व्हावी यासाठी "नागरी सुविधा' आणि "आपले सरकार' केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आढावा बैठक पार पडली. यामध्ये जिल्हा सहकारी बॅंका, खासगी बॅंकांचे पदाधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. 

या संदर्भात माहिती देताना राव म्हणाले, ""राज्यभरातील इंटरनेट सेवेत खंड पडल्यामुळे, तसेच ऑनलाइन अर्जामध्ये स्कॅन कागदपत्रे संकेतस्थळावर टाकण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. पुणे जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी एकूण पाच लाख 40 हजार अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे; परंतु आवश्‍यक कागदपत्रे देऊन अंतिम अर्जांची संख्या 2 लाख 70 हजार इतकी आहे. अद्यापही जवळपास 65 हजार शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले नाहीत, त्यांना येत्या पाच दिवसांमध्ये (शुक्रवारपर्यंत) अर्ज भरण्यासाठी ज्या त्या तलाठी आणि मंडल कार्यालयांकडून प्रोत्साहित केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 392 नागरी सेवा केंद्रे आहेत. अर्ज भरण्यासाठी सर्व नागरी सेवा केंद्रे आणि आपले सरकार केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'' 

""सर्व बॅंकांकडून, तसेच सहकार आयुक्तालयाकडून त्या 65 हजार पात्र असलेल्या; परंतु ऑनलाइन अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. ही गावनिहाय शेतकऱ्यांची यादी ज्या त्या तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसीलदारांना वितरित केली जाईल. येत्या पाच दिवसांमध्ये सर्व अधिकारी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले नाहीत, त्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच, इंटरनेट सुविधा आणि संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करताना येणाऱ्या अडचणींसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला (आयटी) योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे.'' 

जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये "नागरी सेवा आणि आपले सरकार' केंद्रांवर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी अवाजवी पैसे आकारणे, जाणीवपूर्वक केंद्रे बंद ठेवून शेतकऱ्यांची अडवणूक करणे अशा तक्रारी येत आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व 1 हजार 392 नागरी केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरण्याच्या कामावर ती लक्ष ठेवतील. येत्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील उर्वरित 65 हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, असा मला विश्‍वास आहे. 
सौरभ राव, जिल्हाधिकारी 

Web Title: pune news Saurabh Rao, Collector