भूसंपादन, मोबदलावाटप अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - पुणे- नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पाच ठिकाणी बाह्यवळण रस्ता (बायपास) बनविण्यात येत आहे. त्यासाठी भूसंपादन आणि जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदलावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

पुणे - पुणे- नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पाच ठिकाणी बाह्यवळण रस्ता (बायपास) बनविण्यात येत आहे. त्यासाठी भूसंपादन आणि जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदलावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

‘‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवे ॲथोरिटी- एनएचए) आणि जिल्हा प्रशासनाकडून पुणे ते नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये खेड, नारायणगाव, कळंब, आळेफाटा आणि मंचर येथे पाच ‘बायपास’ रस्ते बनविण्यात येत आहेत. त्यापैकी नारायणगाव ‘बायपास’ शंभर टक्के तयार झाला असून, वाहतुकीसाठी खुलाही केला आहे. तसेच, मंचर आणि खेड ‘बायपास’चे काम या आठवड्यात सुरू होणार आहे. परंतु, कळंब आणि आळेफाटा येथील काम अद्याप सुरू झालेले नाही, त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया झाली असून, ज्या शेतकऱ्यांची जमीन या ‘बायपास’साठी संपादित केली आहे, त्यांना मोबदलावाटप सध्या सुरू आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये त्या बायपासचेही काम सुरू करावे लागणार आहे. हा संपूर्ण महामार्ग ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’कडून केला जात आहे. त्यासाठी सुमारे ८० टक्के निधी ‘एनएचए’कडून दिला  जाणार आहे. 

‘आयएल ॲण्ड एफएस’ या कंपनीकडून रस्ता चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. त्यासाठी टोलवसुलीसुद्धा केली जात आहे. आमदार शरद सोनावणे यांनी काही कार्यकर्त्यांसमवेत जाऊन चाळकवाडी येथील टोल नाका बंद केला होता. परंतु, त्यांच्याशीदेखील चर्चा सुरू आहे,’’ असे जिल्हाधिकारी सौरभ राव  यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खेड ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते. भूसंपादन आणि मोबदलावाटपाच्या प्रक्रियेमुळे त्यात खंड पडला होता. परंतु निधी उपलब्ध झाल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली. दिवाळीपूर्वी आळेफाटा आणि कळंब ‘बायपास’चे काम पूर्ण करून ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

Web Title: pune news Saurabh Rao Collector