अहिराणी साहित्यासाठी शिष्यवृत्ती - तावडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पिंपरी - ‘‘अहिराणी भाषेला इतर भाषांप्रमाणेच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. अहिराणी भाषेची नक्कीच वाढ व वृद्धी होईल. अहिराणी साहित्यावर लेखन, संशोधन करणाऱ्या तरुण पिढीला शिष्यवृत्ती देण्यात येईल. अहिराणी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत म्हणून आवश्‍यक ते सर्व प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भोसरी येथे केले.  

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने अंकुशराव लांडगे नाट्यगृहात एकदिवसीय पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन झाले, त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी तावडे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे होते. ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजेंद्र भारूड,  रामचंद्र जाधव, प्रताप पाटील, वनमाला बागुल, राजन लाखे, प्रफुल्ल साळुंखे, विशाल ठाकूर, महेंद्र व प्रशांत पाटील, अनुराधा धोंडगे यांना विविध पुरस्कारांनी गौरविले. तावडे यांनी सुरवातीला अहिराणीतून संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्‍वरांच्या काळापासून अहिराणी भाषा अस्तित्वात आहे. विविध भाषांमध्ये अहिराणी भाषेतील शब्दांचा समावेश आहे.’’

संमेलनाध्यक्ष पिंगळे म्हणाले, ‘‘खान्देशाला अहिराणी भाषेची परंपरा आहे. लोकसाहित्य व मौखिक परंपरा ही अहिराणीची वैशिष्ट्ये आहेत.

खान्देशातील साहित्य, आखाजीची गाणी, कानबाईची गाणी यांचे संकलन व्हायला हवे. अहिराणी भाषा टिकविण्यासाठी अहिराणी साहित्याचे वाचन वाढायला हवे. अहिराणी भाषेत आलेल्या भगवद्‌गीतेचे वाचन होत नाही, याची खंत वाटते. कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यासमोर १० विल्यम शेक्‍सपिअर फिके पडतील. उत्तम दर्जाचे लेखक, प्रतिभावंत कवी अहिराणीत आहेत. अहिराणीतील पुस्तकांना अनुदान मिळायला हवे.’’ 

महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, स्वागताध्यक्ष नामदेव ढाके, मंचाच्या अध्यक्षा विजया मानमोडे आदी उपस्थित होते. ढाके यांनी प्रास्ताविक केले. योगेश कुलकर्णी, प्रवीण माळी यांनी सूत्रसंचालन केले. मानमोडे यांनी आभार मानले. पंकज निकम, दीपक पाटील, शरद पाटील, सुरेश मानमोडे, किरण चौधरी यांच्यासह कस्तुरी मंचाच्या अन्य सदस्यांनी संयोजन केले.

ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भोसरीतील पीएमपीएमएल बसथांब्यापासून अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत सकाळी वाजतगाजत ग्रंथदिंडी निघाली. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत खान्देशवासीय सहभागी झाले होते. या वेळी अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडले. महिला व पुरुषांनी फुगड्यांचा फेर धरला. अहिराणी गीतांवर नृत्य केले. ग्रंथदिंडीत राज्यघटना, ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा, अहिराणी साहित्याची पुस्तके, बहिणाबाई चौधरी आणि साने गुरुजी यांचे साहित्य ठेवले होते. सुमारे तासभर ही ग्रंथदिंडी चालली. 

Web Title: pune news scholarship for ahirani literature