तयारी शाळेची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

शाळेच्या तयारीसाठी "वर्किंग वुमन'ची लगबग

शाळेच्या तयारीसाठी "वर्किंग वुमन'ची लगबग
पुणे - सकाळी उठल्यावर डब्यासाठी स्वयंपाक करण्याची घाई... त्यानंतर वेळेत कार्यालयात पोचण्याची गडबड आणि सायंकाळी घरी येताना किंवा आल्यानंतर आपल्या मुला-मुलीसाठी शालेय साहित्य आणि वस्तूंची खरेदीसाठी वेळ काढणे.. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे आणि मॉन्सूनचेही आगमन झाल्यामुळे अनेक "वर्किंग वुमन'ची अशी धावपळ अन्‌ लगबग सुरू झाली आहे.

पूर्वप्राथमिकपासून माध्यमिक शाळा 15 जून म्हणजे गुरुवारपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच गणवेश, दप्तर, वह्या, पाण्याच्या बाटल्या, रेनकोट, टोप्या, बूट अशा विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीला सुरवात झाली आहे. मंडई, तुळशीबागसह शहराच्या विविध बाजारपेठा आणि शाळांनी ठरवून दिलेल्या काही ठराविक विक्रेत्यांकडे शनिवारी व रविवारी गर्दी झाली होती. येत्या "वीकेंड'लाही अशीच गर्दी अपेक्षित असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्राजक्ता शुक्‍ल म्हणाल्या, 'कामाच्या व्यापातून शनिवारी, रविवारी वेळ मिळत असल्यामुळे बहुतांश शालेय साहित्य खरेदीची कामे सुटीच्या दिवशीच उरकून घेतली आहेत. पहिल्या व दुसऱ्या सत्रासाठी लागणारी महत्त्वाची पुस्तके बाजूला काढून ठेवली आहेत. यंदाच्या वर्षी नवा गणवेश लागणार नसल्यामुळे पूर्वीचाच गणवेश काढून इस्त्री केला आहे. नवी बॅग खरेदी करायची राहिली असून, ती येत्या वीकेंडला करण्याचे नियोजन आहे.''

हिंजवडी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या मानसी पाटील म्हणाल्या, 'सोमवार ते शनिवार कामातून वेळ मिळत नसल्यामुळे बहुतांश कामे रविवारीच उरकावी लागतात. सुटीचा एकच दिवस मिळत असल्यामुळे त्या दिवशीही दुपारी किंवा सायंकाळीच बाहेर पडते. त्यामुळे मुलीच्या शाळेने दिलेल्या यादीनुसार सर्व खरेदी टप्प्या-टप्प्यातच करत आहे. आता साहजिकच पावसाळा सुरू झाल्यामुळे नवीन रेनकोट आणि बुटाची खरेदी करावी लागणार आहे. रोज कामावरून घरी पोचण्यासाठी रात्री नऊ ते दहा वाजतात. त्यामुळे उर्वरित खरेदी येत्या रविवारीच करावी लागेल.''

Web Title: pune news school preparation