शाळा सुरू मुलांची अन्‌ पालकांचीही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

स्वागतासाठी देखणी सजावट; चिमुकल्यांना धीर देण्यासाठी आई-बाबांची उपस्थिती 

स्वागतासाठी देखणी सजावट; चिमुकल्यांना धीर देण्यासाठी आई-बाबांची उपस्थिती 

पुणे - आदल्या दिवशीच्या जोरदार पावसानंतर गुरुवारची पुणेकरांची सकाळ काहीशी धीम्या गतीने सुरू होईल, असं वाटत असतानाच; प्रत्यक्षात मात्र अवघ्या शहराला एक वेगळीच लगबग लागून राहिली असल्याचं पाहायला मिळालं. शहरभर सर्वच रस्त्यांवर, त्यातही मध्यवर्ती पुण्यात तर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीत दिसत होत्या ‘रिक्षावाल्या काकांच्या’ रिक्षा... पिवळ्याधम्मक रंगाच्या स्कूलव्हॅन... सोबतीला खूपशा चारचाकी-दुचाकी... अन्‌ या सगळ्यांतून हळूच डोकावत असणाऱ्या रंगीबेरंगी वॉटर बॅग्ज, नवीकोरी आडवी-उभी दप्तरं, लाल-निळे-हिरवे-किरमिजी गणवेश, बूट-मोजे, टोपी, रेनकोट, कंपास... आणि हे सगळं सांभाळत आपल्या नव्या ‘मोहिमेवर’ निघालेले असंख्य चिमुकले ‘शिपाई’ आणि अर्थातच त्यांचे आई-बाबा !...

एव्हाना ‘शाळा सुरू’ या दोनच शब्दांचं हे सारं वर्णन होतं, हे वाचणाऱ्यांच्या लक्षात आलंच असेल. तर हो, गुरुवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या रस्त्यारस्त्यांवर आणि शाळाशाळांत हे असंच दृश्‍य काहीसं पाहायला मिळत होतं. अनेक चिमुकले आपल्या उण्यापुऱ्या तीन-साडेतीन वर्षांच्या आयुष्यातला पहिलाच शाळेचा दिवस अनुभवायला घाबरतघुबरत सज्ज होऊ पाहत होते, तर त्यांचे कित्येक मोठे दादा-ताई मोठ्या उत्सुकतेने आपल्या पुढच्या इयत्तेच्या वर्गात बसायला आपल्या मित्रकंपनीसोबत अगदी लवकर येऊन थांबले होते. अर्थात, रडूनरडून डोळे आणि गाल लालबुंद झालेल्या छोटुकल्यांना धीर द्यायला त्यांचे आई-बाबा, आज्जी-आजोबा हेही मोठ्या जबाबदारीने आपली जागा लढवत होते. त्यामुळे पहिला दिवस हा मुलांइतकाच त्यांचाही होता.

लहान मुलांना भीती वाटावी, एकेकटं वाटावं, अशा एकेकाळच्या वातावरणातून अलीकडच्या शाळा कधीच बाहेर पडल्या आहेत, हे अगदी जाणवून यावं अशी देखणी सजावट आणि मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी अनेक शाळांमध्ये केल्याचं दिसून आलं. एक उत्साही आणि उत्सवी वातावरण सगळीकडेच जाणवून येत होतं. प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळेचा पहिला दिवस हा त्याच्यासाठी अविस्मरणीय असाच ठरावा, असं जणू प्रत्येकच शाळेने आणि शिक्षकांनी ठरवलं होतं. त्यामुळे मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी शाळांमध्ये पाहायला मिळाल्या. मुलांना शाळेतसुद्धा घरीच असल्यासारखं वाटावं, यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करताना दिसत होते.

नवा गणवेश, नवी पुस्तके 
चलो स्कूल चले हम, या सारखी गीते गात...सरस्वतीचे पूजन करून केलेली सामूहिक प्रार्थना अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरातील विविध शाळांमध्ये गुरुवारी (ता.१५) पहिला दिवस साजरा करण्यात आला. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तके घेऊन शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भविष्याची स्वप्नेही दिसत होती. 

शहरात दिवसभर विविध शाळांमध्ये या निमित्ताने अनोखे उपक्रमही राबविण्यात आले. माहेश्‍वरी विद्या प्रचारक मंडळाच्या महेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, फुलांच्या वेशभूषेत नव्या सवंगड्यांचे स्वागत केले. पर्वत, नद्या, डोंगर, प्राणी, पक्ष्यांची माहिती गाण्यातून सांगितली. पालक व शाळा समितीचे अध्यक्ष बालाप्रसाज बजाज उपस्थित होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मीडियम शाळेत सनई चौघडा लावण्यात आला होता. ‘मला मोठेपणी कोण व्हायचेय’ या संकल्पनेवर काही विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. शाळा समितीचे अध्यक्ष प्रा. सुरेश तोडकर, समितीच्या सदस्या प्रा. रेवती इनामदार, मुख्याध्यापिका सुजाता चाफेकर उपस्थित होते. नू.म.वि. प्रशालेत रांगोळ्यांच्या पायघड्या घालून ढोल लेझीमचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका आशा नागमोडे व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. विद्यार्थ्यांना पुस्तकेही भेट देण्यात आली.

शिक्षिका कल्पना गाडे, सुनीता गजरमल, प्राजक्ता पारेकर उपस्थित होत्या. सुंदराबाई राठी प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा झाला. त्या वेळी मुख्याध्यापिका संध्या माने, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीधर पाटणकर, नगरसेवक राजेश येनपुरे, अश्‍विनी कदम, मृणालिनी जोशी उपस्थित होते.

भेटीला छोटा भीम आणि फुगे !
शाळेत आल्याआल्या विद्यार्थ्यांची कळी चटकन खुलावी म्हणून अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताला फुलांची, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट सज्ज होती. वर्गावर्गांच्या बाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आवारातले सूचना फलकसुद्धा काळी तुकतुकीत अशी नवी नव्हाळी घेत रंगीत खडूंच्या सूचना आपल्यावर मिरवत असल्याचं दिसत होतं. अनेक शाळांत तर ‘छोटा भीम’सारख्या मुलांच्या आवडत्या निरनिराळ्या कार्टून कॅरेक्‍टरची मोठी पोस्टर्स स्वागताला उभी करण्यात आली होती. काही ठिकाणी छान गाणी आणि संगीत कानांवर येत होतं. मुलांना शाळेत असताना मज्जा वाटावी, म्हणून अनेक प्रकारची खेळणी, सायकली, छोट्या घसरगुंड्या आणि चित्रांनी भरलेली पुस्तकंसुद्धा ठेवण्यात आली होती.

Web Title: pune news school start child & parent