शालेय वाहतुकीची 52 वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत 350 वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 75 वाहने शालेय विद्यार्थ्यांची विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 52 वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक लाख 23 हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार शालेय वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन, रिक्षा यांच्यासह सर्वच वाहनांना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. अशा वाहनांवर आरटीओने पुन्हा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत कारवाई करण्यात आली.

या पथकाकडून सुमारे 350 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वैधता प्रमाणपत्र नसणे, स्कूल बसचे वैधता प्रमाणपत्र मुदतीत घेतलेले नाही, स्कूल बस नियमावलीची पूर्तता न करणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविणे, अशा कारणांमुळे जवळपास 75 वाहने दोषी असल्याचे आढळून आले. त्यातील 52 वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत आरटीओकडून एक लाख 23 हजार 300 रुपये दंड, तर सहा हजार 579 रुपये कर जमा करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी स्कूल बस नियमावलीचे पालन करावे, विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, पालकांनीही विद्यार्थ्यांना विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनातून पाठवू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केले आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: pune news school transport 52 vehicle seized