शाळेच्या वातावरणात भरले "रंग'

पांडुरंग सरोदे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - खरं तरं तिची घरची परिस्थिती चांगली आहे. तिची स्वतःची कंपनीही आहे; पण एकदा तिने गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या वस्त्यांमधील शाळांची दुरवस्था पाहिली आणि ठरविले की, यापुढे अशा शाळांच्या भिंती रंगवायच्या! ती युवती आहे, सायली पोंक्षे. या कामासाठी तिला आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमधील तरुण-तरुणींची साथही मिळाली. "क्‍लीनलीनेस ड्राइव्ह' या उपक्रमांतर्गत तिने पारंपरिक पद्धतीने शाळेच्या भिंती रंगवून त्यावर आकर्षक वारली कलाकृती रेखाटण्यास प्राधान्य दिले आहे. तिच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येऊ लागले आहे.

"दि एक्‍सटसी हब' या कंपनीची संस्थापक, तर "ग्रीन अर्थ इक्विपमेंट' या कंपनीची भागीदार असलेल्या सायलीला पूर्वीपासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. वयाच्या 25व्या वर्षीच सामाजिक व आरोग्याशी संबंधित विषयावर काम करणारी कंपनी तिने काढली. मात्र, सामाजिक कार्याची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच कधी अनाथालयात वृद्ध, मुलांशी गप्पागोष्टी करायच्या, तर कधी भिक्षेकऱ्यांना जेवण पुरवायचे. स्वमग्न मुलांसाठी चित्रकला स्पर्धेसह विविध उपक्रमही तिने राबविले. आता तिने शाळांच्या भिंती रंगविण्याचे काम हाती घेतले आहे.

पारंपरिक, नैसर्गिक रंगांबरोबरच चांगल्या दर्जाचा रंग स्वतः आणून देण्याचे काम सायली करते. त्यानंतर तिने केलेल्या आवाहनानुसार, विविध क्षेत्रातील तरुण एकत्र येतात आणि ठरलेल्या ठिकाणी शाळेच्या भिंती रंगवितात. सिंहगड रस्ता परिसरातील ज्ञानसाधना शाळेच्या तीन खोल्या सायली व उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी रंगविल्या आहेत. याच शाळेच्या उर्वरित खोल्याही ते रंगविणार असून, अन्य शाळांमध्येही ते भिंती रंगविण्याचे काम करणार आहेत.

"स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय' या संकल्पनेवर आधारित "क्‍लीनलीनेस ड्राइव्ह' करण्याचा प्रयत्न सायलीने केला. याविषयी सायली म्हणाली, 'गरीब मुले शिक्षण घेत असलेल्या शाळांची दुरवस्था झाली आहे. त्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी आम्ही शाळेच्या खोल्यांच्या भिंती रंगविण्यास प्राधान्य दिले. या कामासाठी जास्त खर्च येत नाही. वेळ देणारे स्वयंसेवक हे काम करतात.''

सहभागी होण्याचे आवाहन
सिंहगड रस्त्यावरील ज्ञानसाधना शाळेमध्ये रविवारी (ता.5) भिंती रंगविण्यासाठी "क्‍लीनलीनेस ड्राइव्ह' राबविण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हा उपक्रम होणार आहे. त्यामध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सायलीने केले आहे.

Web Title: pune news school wall colurfull