वाहनचालकांना बांधल्या सुरक्षा राख्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

ढोल-ताशा महासंघातर्फे शहरात रस्ता सुरक्षा अभियान

ढोल-ताशा महासंघातर्फे शहरात रस्ता सुरक्षा अभियान
पुणे - गणपती बाप्पा मोरया, वाहतूक नियमांचे पालन करूया... लाल रंग दिसल्यावर बैल उधळतात; माणसं नाही, तेव्हा सिग्नल तोडू नका... अशा घोषणा देत पुण्यातील ढोल-ताशा पथकातील तरुणाईने रस्ता सुरक्षा अभियान राबविले. सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांना सुरक्षा राख्या बांधून जनजागृती करण्यासाठी व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची कन्या वंदना ढवळे आणि महापौर मुक्ता टिळक यादेखील युवा वादकांच्या पथकांसोबत रस्त्यावर उतरल्या.

ढोल- ताशा महासंघाच्या वतीने कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात या अभियानास तेंडुलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला. ऍड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई, इक्‍बाल दरबार, प्रणव पवार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ या वेळी वादकांनी घेतली.

ढवळे म्हणाल्या, 'गाडी चालविताना हातातले किंवा पायातले ब्रेक वापरण्याऐवजी डोक्‍यातील ब्रेक अवश्‍य वापरायला हवे, असे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे आज ढोल-ताशा वादकांनी हा पाच दिवसांचा उपक्रम राबवून बाबांना वेगळ्या प्रकारे आदरांजली अर्पण केली आहे. बाबांनी सुरू केलेल्या वाहतूक जनजागृतीचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''

ढोल-ताशा महासंघातर्फे पुण्यातील तब्बल पथके या अभियानात सहभागी झाली आहेत. यामध्ये शनिवारपर्यंत (ता.5) शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या 80 चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक जनजागृती करण्यात येईल. यामध्ये जनजागृतीपर फलकांसह सुरक्षा राखी बांधून वाहनचालकांना माहितीपत्रके देण्यात येतील. पुण्यातील तब्बल पाच हजार युवा ढोल-ताशावादक या अभियानात सहभागी होणार असून, हीच तेंडुलकर यांना खरी आदरांजली असेल.
- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल- ताशा महासंघ

Web Title: pune news the security rakhi built for drivers