डेंगीच्या रुग्णांचे रक्तनमुने पाठवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

महापालिकेचे खासगी रुग्णालयांना आदेश

पुणे - खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या डेंगीच्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याचा आदेश शहरातील रुग्णालयांना देण्यात आला आहे. ही रक्ततपासणी मोफत होणार असल्याने रुग्णांकडून शुल्क घेऊ नये, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. 

महापालिकेचे खासगी रुग्णालयांना आदेश

पुणे - खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या डेंगीच्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याचा आदेश शहरातील रुग्णालयांना देण्यात आला आहे. ही रक्ततपासणी मोफत होणार असल्याने रुग्णांकडून शुल्क घेऊ नये, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. 

पावसाळा सुरू झाल्याने शहरात डेंगी, चिकुनगुन्या, हिवताप या कीटकजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढत आहे. शहरात गेल्या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे पुणे डेंगीच्या तापाने फणफणल्याचे चित्र निर्माण झाले होते. या वर्षीही पावसाळ्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जुलैच्या अवघ्या १२ दिवसांमध्ये डेंगीचे ५७ संशयित रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेत झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयांना हा आदेश देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळाली. 

डेंगीच्या प्रत्येक रुग्णाची माहिती महापालिकेला कळविणे आता बंधनकारक केले आहे, त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा सक्रिय केली आहे. रुग्णालयांमधून डेंगीचे निदान करण्यासाठी ‘एनएस १’सारख्या चाचण्या केल्या जातात. 

पण, याचे निश्‍चित निदान करण्यासाठी रुग्णालयात दाखल अत्यवस्थ रुग्णांच्या रक्ताचे नमुने महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय किंवा डॉ. नायडू रुग्णालयात पाठवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पाचपेक्षा जास्त दिवस ताप असलेल्या रुग्णांचेही रक्तनमुने रुग्णालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 
आतापर्यंत डेंगीच्या निदानासाठी रक्तनमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) तपासण्यासाठी पाठविण्यात येत होते. आता महापालिकेच्या या दोन केंद्रांवर ‘एनआयव्ही’च्या किटच्या आधारावर डेंगीच्या विषाणूंची तपासणी होते. या दोन्ही केंद्रांना सेंटीनल सेंटरचा दर्जा दिला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

शहरातील डेंगीचे संशयित रुग्ण
महिना ......................... रुग्ण संख्या

जानेवारी ...................... १९
फेब्रुवारी ...................... १६
मार्च ........................... २८
एप्रिल .......................... २३
 मे ............................. २८
जून ............................ ५८
१२ जुलैपर्यंत ............... ५७

रुग्णाच्या उपचारांच्या दृष्टीने डॉक्‍टरांना योग्य वेळेत अचूक निर्णय घेणे आवश्‍यक असते. डेंगीची लक्षणे असलेल्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने रुग्णालयांनी महापालिकेच्या सेंटीनल सेंटरकडे पाठवावेत किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावेत.
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Web Title: pune news Send blood for Dengi patients