ज्येष्ठ रक्षणाय

ज्येष्ठ रक्षणाय

पुणे - वयाची साठी ओलांडल्यानंतर मुले सांभाळतील, अशी आई-वडिलांची भावना. मात्र संपत्तीच्या लालसेपोटी, तर कधी आपसांत पटत नाही; म्हणून मुलगा-सुनेकडून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा कटू अनुभव वृद्धापकाळात काही ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा लागत आहे. यासह विविध तक्रारी पोलिस आयुक्‍तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात येत असून त्याचे निवारण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना बऱ्यापैकी दिलासा मिळत आहे. 

मुले सांभाळत नाहीत... मारहाण करतात... घर नावावर करून घेतात... पेन्शनची रक्‍कम परस्पर उचलतात... एकाकी जीवन जगावे लागतेयं... अशा विविध तक्रारी ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत. मध्यमवर्गीय, प्रतिष्ठीत कुटुंबीयांमध्ये हे प्रमाण तुलनेत अधिक आहे. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षात तक्रार देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक पुढे येत आहेत. 

पोलिसांच्या अडचणी
 बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे मालमत्तेबाबतचे वाद
 वृद्धापकाळात न्यायालयात दावा दाखल करून ते प्रकरण लढविणे अशक्‍य  
 त्यात पोलिसांना मर्यादित अधिकार   

सर्व पोलिस ठाण्यांत नोडल अधिकारी
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यात एक पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांचा व्हॉट्‌सॲप ग्रुपही स्थापन केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी
प्रत्येक पोलिस ठाण्यात त्या भागातील ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केली जाते. त्यांना ओळखपत्र दिले जात आहे. ओळखपत्रावर रक्‍तगट, पत्ता, मोबाईल क्रमांक, नातेवाइकांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक याचा उल्लेख केला आहे. जेणेकरून संबंधित ज्येष्ठ नागरिकास तातडीने मदत मिळणे शक्‍य होईल.

तक्रारींचे स्वरूप
ज्येष्ठ नागरिक कक्षातील हेल्पलाइन क्रमांकावर गंभीर आणि विविध स्वरुपांच्या तक्रारी येतात. गॅस संपला आहे, पोस्टात, बॅंकेत जायचे आहे, शेजारी त्रास देतात, वीज गेली आहे, फोन बंद पडला आहे, ड्रेनेज तुंबलेय, झाड पडले आहे, भटकी कुत्री त्रास देतात, असे या तक्रारींचे स्वरूप असते. काहीजण वृद्धाश्रमाचा पत्ता विचारतात. या कक्षातील पोलिस कर्मचारी महापालिका क्षेत्रीय कार्यालय, महावितरण, गॅस एजन्सी अशा संबंधित विभागात फोन करून त्या सोडवितात.

पोलिस आयुक्‍तांकडून प्रयत्न  
पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सह आयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय निकम, वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक संपत पवार, महिला पोलिस हवालदार जयश्री जाधव, पोलिस नाईक पूनम बारसकर आणि कर्मचारी पल्लवी गलांडे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून, त्याला पोलिसांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी पोलिस आयुक्‍तालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथक नेमले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी काही अडचण असल्यास हेल्पलाइन क्रमांक अथवा संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. त्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येईल. 
- रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्‍त

प्रातिनिधिक घटना 

एका निवृत्त कर्नलला त्यांचा मुलगा आणि सून मानसिक त्रास देत आहेत. सूनेकडून घाणेरडे आरोप, तसेच ती ‘शेमलेस’ म्हणून हिणवते. सैन्यदलात देशाची इतकी वर्षे सेवा केली; पण वृद्धापकाळात हे दिवस बघायला मिळाले, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. न्याय मिळावा, यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षात तक्रार दिली आहे. 

पेन्शनर असलेल्या विधवा आजीचे दोन मुले चांगल्या नोकरीला आहेत. त्यांनी बनावट मृत्यूपत्र तयार करून सिंहगड रस्ता परिसरातील गणेश मळा आणि बिबवेवाडी येथील घर बळकावले. ते मुलीलाही भेटू देत नाहीत. याबाबत आजीनी ज्येष्ठ नागरिक कक्षात तक्रार दिली. त्या वेळी घरी जाताना बसचे भाडे देण्यासाठीही आजीकडे पैसे नव्हते. पोलिसांनी त्यांना मदत केली. आजीने जाताना मुलांना त्रास होऊ नये, म्हणून त्यांना काही सांगायचे असल्यास सुटीच्या दिवशीच बोलवा, असे आवर्जून सांगितले.

वडापाव, सामोसे विकून आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला; पण मुलगा आणि सुनेने आईला वर्षभरापूर्वी घराबाहेर काढले. घरात राहण्यासाठी किमान एक खोली द्यावी, अशी आईची इच्छा आहे. समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या महिलेने ज्येष्ठ नागरिक कक्षात अर्ज केला आहे. 

मगरपट्टा सिटीमधील ७० वर्षीय महिला सकाळी नऊ वाजता पोलिस आयुक्‍तालयाच्या प्रवेशद्वारावर आली. ‘सीपी रश्‍मी शुक्‍ला मॅडम को मिलना है’, असे या महिलेने सांगितले. पोलिसांनी कारण विचारले असता, पती मारहाण करतात. व्यवस्थित लक्ष देत नाहीत. एक मुलगा अमेरिकेत, दुसरा जपानमध्ये नोकरीस आणि तिसरा मुलगा पुण्यात अभियंता असल्याचे सांगितले. पोलिसांनी पती आणि मुलांना बोलावून समजावून सांगितले. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लागला.

एक ज्येष्ठ नागरिक खासगी कंपनीत २०१२ पासून सर्व्हिस मॅनेजर पदावर काम करीत होते. कंपनीने त्यांचे सुमारे दोन लाख रुपये वेतन थकविले होते. कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. याबाबत कक्षात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटविले. कंपनी मालकाने त्या ज्येष्ठ नागरिकास दरमहा २० हजार रुपये देण्याचे ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com