सातवी, नववीची पुस्तके झाली बोलकी

प्रसाद पाठक
गुरुवार, 15 जून 2017

पुस्तकातील क्‍युआरकोडच्या मदतीने अभ्यासाचे व्हिडिओ पाहता येणार

पुस्तकातील क्‍युआरकोडच्या मदतीने अभ्यासाचे व्हिडिओ पाहता येणार
पुणे - मुलांनो, मोबाईल ऍप्स्‌वरून भाषेचे धडे गिरवायचेत?, सायबर युद्ध, रॅन्समवेअर व्हायरस म्हणजे काय हे व्हिडिओद्वारे समजून घ्यायचेय ?... तर मग इयत्ता सातवी आणि नववीची नवी पुस्तके विकत घ्या. या पुस्तकातील क्‍युआरकोडच्या मदतीने तुम्ही मोबाईलवर चक्क अभ्यासाचे व्हिडिओ पाहू शकता. ही पुस्तके आता फक्त वाचण्यापुरती उरलेली नाहीत तर डिजिटल जमान्यानुसार प्रत्यक्ष बोलती-गाती झालेली आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)ने बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सातवी आणि नववीची पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. एफोर साइजमध्ये आलेली ही पाठ्यपुस्तके चार रंगांमध्ये आहेत. विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रम, कृतियुक्त अध्ययन, स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित केले आहे.

पाठ्यपुस्तकांना इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी (आयसीटी) विषयीच्या लिंक देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संगणकसाक्षरता वाढीला प्राधान्य देण्यात आले असून, शिक्षकांनाही सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षी सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये चाचणी स्वरूपात क्‍युआर कोड समाविष्ट करण्यात आला होता. सातवी आणि नववीच्या बदलेल्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात क्‍युआर कोड देण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यावर क्‍युआर कोडद्वारे लिंक अपलोड करण्यात येतील, असे बालभारतीच्या सूत्रांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती या पाठ्यपुस्तकांमध्ये दिली आहे. नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात 1961 ते 2000 पर्यंत घडलेल्या घडामोडींचा समावेश असून, प्रत्येक पाठ्यपुस्तकात चित्रमय पद्धतीने विषयाची मांडणी केली आहे. सातवीच्या इतिहासात मध्ययुगीन महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांपर्यंतचा इतिहास आहे. पूर्वीच्या भूगोलाच्या पुस्तकात प्रादेशिक संकल्पनांचा उल्लेख होता. बदललेल्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्र विषय भूगोल विषयात समाविष्ट केला आहे. चित्रमय पद्धतीने भूगोलाची माहिती दर्शविली आहे. ऊर्जेचे उत्सर्जन म्हणजे भूकंप, नागरीकरण, जागतिक आर्थिक संघटना आदींचीही तोंडओळख या निमित्ताने विद्यार्थ्यांना होईल. नववीला यापूर्वी सामान्य गणित भाग एक व दोन, बीजगणित, भूमिती अशी पुस्तके होती. यावर्षीपासून सामान्य गणित भाग एक व दोन हीच पुस्तके असतील. बीजगणित, भूमितीचे धडेदेखील याच पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांना गिरविता येतील. पुनर्रचित अभ्यासक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातही काठीण्यपातळी, भविष्यातील विविध शाखांचे महत्त्व, विद्यार्थ्यांनी स्वतः करावयाचे प्रयोग अशी रचना केली आहे. प्रयोगशाळा ओळख, प्रायोगिक कौशल्य विकास, विज्ञानातील विविध संकल्पनांचा समावेश आहे. मराठीच्या विषयात आदिवासी साहित्य, अण्णा भाऊ साठे यांचा पोवाडा, हास्यचित्रातील मुले ते अगदी विश्‍वकोशविषयक माहिती देण्यात आली आहे.

'अभ्यासक्रम तयार करताना नागरिकांची मते मागविली होती. विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार केला आहे.

विद्यार्थ्यांना विचारास प्रवृत्त करणारा अभ्यासक्रम आहे. ऑनलाइन शॉपिंगसह अगदी अलीकडच्या इतिहासातील घटनांचीही विद्यार्थ्यांना माहिती मिळेल.''
- डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती

Web Title: pune news seventh ninenth books