"त्यांनी' व्यापक भूमिका घेण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

प्रसिद्धीसाठी मारामारी 
कै. थोरात हा राजकीय समज असलेला आणि हाडाचा कार्यकर्ता होता, असे सांगून बापट म्हणाले, ""कधीही प्रसिद्धीच्या मागे ते लागले नाहीत. मात्र आजकाल फोटो काढण्यासाठी, बॅनर लावण्यासाठी आणि व्यासपीठावरील खुर्चीवर बसण्यासाठी कार्यकर्त्यांची मारामारी सुरू असते. आमच्याच कार्यक्रमात आम्हाला ढकलून देतात. शेवटी त्यांना सांगण्याची वेळ येते.''

पुणे - ""राजकारणात तुम्ही राजकीय पक्षाचे नेते म्हणून स्पष्ट भूमिका घेणे समजू शकतो. परंतु राज्य किंवा राष्ट्राच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारता, तेव्हा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून देशातील सर्व घटक तुमचे आहेत, याची खबरदारी घेऊन व्यापक भूमिका घेण्याची गरज असते,'' अशा शब्दांत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यशैलीवर शुक्रवारी टीका केली. मोदी यांनी केलेल्या "मी पवार यांचे बोट धरून राजकारण आलो,' या वक्तव्याचा देखील खुलासा या वेळी पवार यांनी केला. 

निमित्त होते कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे. या वेळी पवार यांच्या हस्ते सामाजिक आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. मेधा पुरव-सामंत, विवेक खटावकर आणि हर्षा शहा यांना कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, उल्हास पवार, मोहन जोशी, रामदास फुटाणे, शुभांगी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पवार यांनी "कार्यकर्त्याने कशा पद्धतीने सार्वजनिक जीवनात काम करावे, याचा आदर्श थोरात यांनी घालून दिला,' असे गौरवोद्‌गार काढले. 

मोदी यांचे नाव न घेता पवार यांनी, ""राजकीय क्षेत्रात काम करताना राजकीय विचारधारा कोणतीही असो, पण वैयक्तिक पातळीवर तुमचा सलोखा कसा राहील याची खबरदारी घेतली पाहिजे,'' असे सांगून त्यांनी कै. बापूसाहेब काळदाते यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ""मध्यंतरी कोणीतरी मी पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे म्हटले. ती व्यक्ती मोठी असल्यामुळे माझी अडचण झाली. त्यानंतर काही दिवस मी दिल्लीला जाणे सोडले. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही भेटणे टाळले. मी कृषिमंत्री असताना देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी माझा संबंध आला. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री मोदी होते. त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. सरकारने अशा काळात सर्व राज्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळेच ते असे म्हणत असावेत,'' असा खुलासा पवार यांनी या वेळी केला. 

पुरस्कारानंतर मनोगत व्यक्त करताना हर्षा शहा म्हणाल्या, ""केंद्र सरकारच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या योजनेत पुण्याचा समावेश करण्यासाठी पवार यांनी पुढाकार घ्यावा.'' कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विकास अबनावे यांनी आभार मानले. 

Web Title: pune news sharad pawar Dhananjay Thorat Award