सुंदर परी पर्यावरणाला घातकच!

श्रीकांत इंगळहळ्ळीकर
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे - पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेला फुलणारी पिवळी-गुलाबी फुले आकर्षक दिसत असली तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही फुले तितकीच घातक असल्याचे वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ही विदेशी फुले स्थानिक मोसमी वनस्पती आणि गवत यांना वाढू देत नाहीत, त्यामुळे झपाट्याने फोफावणाऱ्या या वनस्पतीला वेळीच रोखणे आवश्‍यक आहे.

पुणे - पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेला फुलणारी पिवळी-गुलाबी फुले आकर्षक दिसत असली तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही फुले तितकीच घातक असल्याचे वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ही विदेशी फुले स्थानिक मोसमी वनस्पती आणि गवत यांना वाढू देत नाहीत, त्यामुळे झपाट्याने फोफावणाऱ्या या वनस्पतीला वेळीच रोखणे आवश्‍यक आहे.

कॉसमॉस सल्फ्युरियस हे या फुलांच्या झाडाचे शास्त्रीय नाव आहे. कॉसमॉस या मूळच्या मेक्‍सिकोतल्या वनस्पतीचा फैलाव पश्‍चिम महाराष्ट्रात कसा आणि कधी झाला हे कळलेच नाही. एक नावीन्यपूर्ण आणि सुंदर फूल म्हणून कॉसमॉसचे फोटो मी ४० वर्षांपूर्वी काढलेले मला आठवते. तेव्हा ही वनस्पती फक्त कात्रज घाटात रस्त्याकडेला होती.

शोभेच्या फुलांच्या एका व्यावसायिकाने कॉसमॉसच्या बिया रस्त्याकडेला छान दिसेल म्हणून सहज टाकल्या, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर चार दशकांत ही वनस्पती शेकडो किलोमीटर दूरपर्यंत पसरली. इथले हवामान आणि जमीन तिला फारच मानवली आहे. कीड नाही आणि गुरे तोंड लावत नाहीत म्हणून फोफावली आहे. 

कॉसमॉसची सुनामी आल्याचे दृश्‍य
पावसाळ्यानंतर वाळून गेल्यावर कॉसमॉसच्या बिया उधळून भोवती पसरतात. गुरांकडून त्या गवताळ कुरणांवर पसरतात. वाहनांच्या टायरमध्ये अडकून त्या खूप लांब पोचतात. त्यामुळेच ही वनस्पती रस्त्याकडेला दरवर्षी पुढेपुढे जात आहे. या वर्षी उशिरा पाऊस झाल्यामुळे सध्या तर सगळ्या रस्त्याच्या कडेला या कॉसमॉसची सुनामीच आल्याचे दृश्‍य बघायला मिळत आहे.

प्रसार थोपविणे आवश्‍यक
नेहमी कमरेइतकी उंच असणारी ही वनस्पती या वर्षी दहा फुटाला पोचली आहे. सोनकी तेरड्यासारख्या मोसमी वनस्पती आणि गवत यांना वाढू न देणाऱ्या या आक्रमक कॉसमॉसला थोपविणे आवश्‍यक झाले आहे.

काससारख्या जागी जिथे हजारो वाहने जातात तिथे ही वनस्पती पोचण्यापूर्वीच काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात फुले येण्यापूर्वी उगवलेली झाडे उपटणे हाच एकमेव उपाय आहे. खरेतर आत्ताच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कॉसमॉस बायपिन्नाटस ही गुलाबी फुलांची आणखी एक जात नाशिक रस्त्यावर आढळते; पण तिचा विस्तार मर्यादित आहे.

Web Title: pune news shevanti flower