केशरमिश्रित शिरखुर्मा आणि बनारसच्या शेवया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पुणे - काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, मनुके, आक्रोड, खारीक, (मगज बी) कलिंगडाचे बी, खसखस, सुकलेले अंजीर, दूध आणि शेवया यांच्या सोबतीला नेपाळ आणि काश्‍मीरचे केशरमिश्रित शिरखुर्मा करण्यासाठी मुस्लिम महिला तयारीला लागल्या आहेत. रमजान ईद २६ जूनला आहे. त्यामुळे हाताळायलाही पातळ आणि दूधातही सहज विरघळणाऱ्या शेवया मालेगाव, राजस्थान, बनारस येथून आल्या आहेत.

मे महिन्यातला लग्नसराईचा काळ आणि जून महिन्यात शाळांची तयारी करावी लागत असल्याने, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुकामेव्याची फारशी आवक झालेली नाही. कॅम्प भागातील शिवाजी मार्केट, मोमीनपुरा, कोंढवा येथील कौसरबाग येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे केसरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या शेवया आणि सुकामेव्याने बाजारपेठेतील स्टॉल्स सजले आहेत.   

रमजान महिन्यानिमित्त मुस्लिमधर्मीयांच्या घरोघरी सहेरी आणि इफ्तारसाठी विविध पदार्थांचे बेत रंगू लागले आहेत. विशेषतः सहेरीला रोट आणि इफ्तारला फळांचा आहार असतो. ईदला नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना घरी बोलावायचे आणि शिरखुर्मा करायचा. हा ठरलेला बेत असतो. बाजारात कस्टर्ड पावडर, विलायची, सुरतफेणीसोबतच इसेंन्सही आले आहेत. ईदसाठी आत्तापासून मुस्लिम नागरिक शिरखुर्म्याच्या तयारीला लागले आहेत. शिरखुर्म्यासाठी सुकामेव्याचे रेडिमेड बॉक्‍सही आले आहेत. 

विक्रेते अकबर खान म्हणाले,‘‘यंदा सुकामेव्याला उठाव कमी आहे. मात्र, ईद जशी जवळ येईल, तशी विक्री वाढेल. दरवर्षी सातारा येथून हातवळणीच्या शेवया येतात; परंतु यंदा आल्या नाहीत. त्यामुळे परराज्यातून आलेल्या शेवयांना नागरिक पसंती दर्शवू लागले आहेत. दालचा मसाला, बिर्याणी मसाल्यालाही चांगली मागणी आहे.’’

Web Title: pune news shirkhurma & banaras shevaya