कुस्ती बरोबर मल्लखांबावर कसरती; यात्रांना वाढणार गर्दी

युनूस तांबोळी
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

ग्रामीण भागातील तरूण हा व्यायामामुळे व कसरतीमुळे वेगवेगळ्या स्पर्धेत नावलौकीक मिळवतो. मात्र तरूणांमध्ये वाढलेले व्यसनाधिता यामुळे सध्या मल्लखांबावरील कसरती ह्या लोप पावत चालल्या आहेत. ग्रामस्थांनी तरूणांना यांत्रामधुन कुस्ती व मल्लखांब कसरतीसाठी प्रोत्साहन पाहिजे. त्यातून गावातील तरूणाई निरोगी राहण्यास मदत होईल.
- अभीजीत सुदाम गायकवाड, विक्रीकर अधिकारी, मलठण, ता. शिरूर.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): कुलदैवतांच्या यात्रा जत्रा म्हटल्या की, वर्षातून एकदा वेगवेगळे मनोरंजन हे ठरलेलेच असते. या यात्रांमध्ये दिवसा बैलगाड्यांच्या शर्यती हा मनोरंजनाचा विषय होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली. त्यामुळे यात्रेत मनोरंजन कसे करायचे. यावर मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी तोडगा काढला असून, कुस्ती आखाड्याबरोबर मल्लखांबावरच्या कसरतीवर अधिक भर दिला आहे. योग व आरोग्य याकडे विषेश लक्ष देण्यासाठी भावीपिढी घडविण्याचे काम ग्रामस्थांनी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

शिरूर तालुक्यातील मलठण हे गाव मल्लांचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मल्ल घडविण्याचे काम ग्रामस्थांच्या मदतीने होत होते. गावच्या नाव लौकीकात भर पडावी यासाठी गाव खर्च करून मल्ल तयार करत होते. मात्र काही काळापासून गावच्या आखाड्यात खेळणारे बोटावर मोडण्याइतके मल्ल राहिले. या गावात विविध क्षेत्रात निवृत्ती घेतलेले अनेक जेष्ठ नागरीक आहेत. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यावरून त्यांनी गावातल्या तरूण पिढीवर व्यायामाचे संस्कार देण्यास सुरवात केली आहे. गेली दोन वर्षापासून कुस्तीसाठी क्रिंडागण तयार करून घेण्यात आले आहे. बैलगाडा घाट व शर्यतीच्या खर्चासाठी मोठा निधी ग्रामस्थ गोळा करत होते. एक दिवसाच्या या मनोरंजनाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यापासून येथे बैलगाडा शर्यती बंद झाल्या आहेत. त्यातून तरूणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढीस लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यात्रांमध्ये काहीतरी मनोरंजन पाहिजे यासाठी मोठा आखाडा भरविण्यासाठी त्यांनी गोळा केलेला निधी वापरण्याचे ठरविले. क्रिडागणांबरोबर त्यांनी मल्ल तयार करण्याचे काम सुरू केले. त्यातून मल्लांचे गाव म्हणून तालुक्यात त्यांची पुन्हा ओळख होणार आहे. महाविशिवरात्रीला येथे मल्लीकार्जूनची यात्रा भरते. त्यावेळी हा आखाडा रंगणार आहे. माजी मुख्याध्यापक सुरेश खंडू गायकवाड यांनी येथील लहान थोरांना मल्लखांबावरच्या कसरती शिकविण्याचे काम हाती घेतले आहे. तरूणाईच्या शक्तीला यामुळे पाठबळ मिळणार आहे. प्राध्यापक अशोक शिंदे हे युवकांना प्रात्यक्षिकाचे धडे देत आहेत. मल्लखांबाच्या सुरू असणाऱ्या सरावामुळे या वर्षी मल्लखांबाच्या कसरती हे येथील यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

Web Title: pune news shirur malthan yatra youth wrestling mallakhamba