पंचायत समिती सदस्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल

भरत पचंगे
मंगळवार, 20 मार्च 2018

शिक्रापूर (शिरूर, पुणे): निमगाव-म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे अवैधरीत्या वाळू उपसा केल्याप्रकरणी शिरूर पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिरूर न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला.

शिक्रापूर (शिरूर, पुणे): निमगाव-म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे अवैधरीत्या वाळू उपसा केल्याप्रकरणी शिरूर पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिरूर न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला.

याबाबत मंडलाधिकारी उद्धव फुंदे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 7 मार्च रोजी तहसीलदार रणजित भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील निमओढा सरकारी गायरान गट क्र.455 मध्ये पोकलेन व ट्रॅक्‍टरच्या साह्याने बेकायदा वाळू उपसा सुरू होता. त्यानुसार भोसले यांनी फुंदे यांना प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्याची सूचना केली. फुंदे यांनी निमओढ्याला भेट दिली असता तिथे वाळू उपसा सुरू होता. याबाबत ट्रॅक्‍टरचालक राजू जितन पटेल याने सदर ट्रॅक्‍टर व पोकलेन गेल्या तीन दिवसांपासून वाळू उपसा करीत असून ते विजय सोमनाथ रणसिंग यांचे असल्याचे सांगितले. काही वेळातच या ठिकाणी स्वतः रणसिंग दाखल झाले व त्यांनी पोकलेन ऐवजी ट्रॅक्‍टरवर कारवाई करण्याची विनंती केली. या संपूर्ण घटनाक्रमात विजय रणसिंग यांच्याकडूनच सदर वाळूचोरी होत असल्याची फिर्याद फुंदे यांनी दिल्यावरून रणसिंग यांच्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, रणसिंग हे सोमवारी (ता. 19) शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजर झाल्याने त्यांना अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिली. रणसिंग हे निमगाव म्हाळुंगी गणातून अपक्ष निवडून आले आहेत.

Web Title: pune news shirur sand vijay ransing crime