सोशल मीडियाच्या अतिरेकाने समाजमन अस्वस्थ: डॉ. रत्नाकर महाजन

नागनाथ शिंगाडे
सोमवार, 5 मार्च 2018

तळेगाव ढमढेरे (पुणे) सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे समाजमन अस्वस्थ होत असून, या मीडियामुळे दुखावलेली मने जोडण्याचे काम युवकांनी करणे गरजेचे आहे. समाजाभिमुख वर्तन ठेवून समाजोपयोगी कामे करण्यास युवकांना हीच संधी आहे, असे मत राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आणि स्व. साहेबरावअण्णा ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणून महाजन बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे होते. यावेळी प्राचार्य प्रदीप पाटील, उपप्राचार्य पराग चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, पराग गायकवाड आदी उपस्थित होते.

"भारतासारख्या विकासाच्या टप्प्यावर असलेल्या देशात युवा पिढी भरकटत जाणे परवडणारे नाही म्हणून मूल्यशिक्षण महत्त्वाचे आहे. यशासाठी शॉर्टकट महत्त्वाचा नसून सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,' असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले.

यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू स्वप्नील ढमढेरे याचा विशेष सत्कार डॉ. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप सांगळे यांनी प्रास्ताविक, प्रा. दत्तात्रेय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दत्तात्रेय वाबळे यांनी आभार मानले.

Web Title: pune news shirur social media youth dr ratnakar mahajan