पुण्यात शिवसेनेचा ‘सामना’ भाजपशीच

संभाजी पाटील
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे - आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने पुण्यातील लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. शहरात अडीच ते तीन लाख शिवसेनेचा पारंपरिक मतदार असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी आमचीच खरी लढत असल्याचा दावाही शिवसेनेच्या पुण्यातील नेत्यांनी केला आहे. 

पुणे - आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने पुण्यातील लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. शहरात अडीच ते तीन लाख शिवसेनेचा पारंपरिक मतदार असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी आमचीच खरी लढत असल्याचा दावाही शिवसेनेच्या पुण्यातील नेत्यांनी केला आहे. 

मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे पुण्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना प्रथमच उतरणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेवर स्वार होत भाजपने पुण्यात तब्बल सव्वा तीन लाखांच्या मताधिक्‍याने विजय मिळविला होता. या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेनेचा भाजपला निश्‍चितच या निवडणुकीत फायदा झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढली.  पुण्यातील विधानसभेच्या आठही जागा भाजपने जिंकल्या, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेचा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या वर्षभरात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर अनेक फेरबदल केले आहेत. खासदार संजय राऊत यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपवली असून, संपर्कप्रमुख म्हणून माजी मंत्री उदय सामंत काम पाहत आहेत. शहरप्रमुख म्हणूनही माजी आमदार महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे या दोघांची निवड केली आहे. राऊत यांच्या सोबतच स्वतः आदित्य ठाकरे यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रित केल्याने शिवसेना २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देईल, असा विश्‍वास पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आहे. 

शिवसेनेची पुण्यात नेमकी काय ताकद आहे, याचा अंदाज विधानसभा निवडणुकीवेळीच आला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांत स्वतंत्र लढलेल्या सेनेला विधानसभा निवडणुकीत एक लाख ६२ हजार मते मिळाली होती. त्यात वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघांत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. वडगाव शेरीत विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि शिवसेनेचे सुनील टिंगरे यांच्यातील सामना पाच हजार मतांमध्ये रंगला होता. आतापर्यंत कोथरूडवर शिवसेना दावा करीत होती. मात्र विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही भाजपने या ठिकाणी सेनेवर मोठ्या मतांच्या फरकाने मात केली होती. तरीही पुणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा असणारा पारंपरिक मतदार भाजपच्या दृष्टीने अडचणीचा ठरू शकतो. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, असे दोन्ही नेते बोलत आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आणि आप अशी पंचरंगी लढत पुण्यात पाहायला मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आता कमी झाला आहे. पुण्यात शिवसेनेची पहिल्यापासून ताकद आहेच. आम्ही पूर्ण ताकदीने लढू. वर्षभरात शिवसेना घराघरांत पोचून आमची ताकद आम्ही दाखवू.
- चंद्रकांत मोकाटे,   शिवसेना शहरप्रमुख

शिवसेना वेगळी लढणार असल्याने आम्हाला निश्‍चितच आणखी काम करावे लागेल. पुण्यातील अनेक प्रश्‍न आम्ही मार्गी लावले आहेत; पण कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला आम्ही कमी मानत नाही. आमचे काम जोमाने सुरू केले आहे. 
- अनिल शिरोळे, खासदार  

Web Title: pune news shiv sena bjp politics PMC