शिवरायांनी दिलेल्या सनदेचा शोध

शिवरायांनी दिलेल्या सनदेचा शोध

इंग्लंडमधील ब्रिटिश लायब्ररीत चाफळ देवस्थानाबाबतची प्रत सापडली
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या चाफळ देवस्थानाच्या व्यवस्थेसंबंधी मूळ सनदेचा शोध लागला आहे. मूळ सनदेची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली प्रत इंग्लंडमधील ब्रिटिश लायब्ररीत सापडली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभेत इतिहास अभ्यासक- लेखक कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी या सनदेचे वाचन नुकतेच केले.

नव्याने सापडलेल्या मूळ पत्राचे चित्र या वेळी प्रकाशित करण्यात आले. याबाबत कस्तुरे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिले होते. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्रं हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत,

त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण अकरा मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.’’ 

‘‘श्रीसद्‌गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरुप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्रं सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वत:च्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्‍यात लिहिले आहे. लवकरच या पत्राचे छायाचित्र नागरिकांसाठी संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिले जाईल, असेही कस्तुरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com