यश संपादन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया - शिवराज गोर्ले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे - यशाचे शिखर असे काही नसते, यश संपादन करणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व प्रेरक वक्ते शिवराज गोर्ले यांनी व्यक्त केले.

सकाळ वाचक महोत्सवांतर्गत, सकाळ प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘यशस्वी व्हावं कसं? स्पर्धा परीक्षेतच नव्हे, तर आयुष्यातही!’ या विषयावर गोर्ले बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘यश म्हणजे केवळ पैसा, प्रसिद्धी मिळवणे नव्हे. यश म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखणे आणि त्यांचा योग्य उपयोग करणे. साचेबद्ध मार्ग न चोखाळता, ‘मला नक्की काय करायचे आहे, काय केल्याने मी आनंदी राहू शकेन’ ते ओळखणे; त्यानुसार संधी शोधणे, संधी निर्माण करणे म्हणजे यश. यश मिळविण्यासाठी योग्य आत्मविश्‍वास हवा. जे काम करायचे आहे त्यातून आनंद मिळायला हवा, तरच त्यासाठी केलेले कष्ट आनंददायक वाटतात. यश मिळविण्यापेक्षा यश टिकवणे अधिक कठीण असते. यश टिकविण्यासाठी सातत्यपूर्ण कष्ट करण्यापेक्षाही, स्वत:च्या भावना समजून त्यावर नियंत्रण ठेवायला जमणे महत्त्वाचे आहे. भरपूर यश मिळाल्यानंतरही यश डोक्‍यात जाऊ न देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वत:च्या ‘भावप्रज्ञे’वर काम करायला हवे.’’ 

अपयशाने निराश व्हायचे नसेल तर आपण योग्य पद्धतीने अपयशाला सामोरे जायलाही शिकायला हवे. कुठल्याही गोष्टीचा दुराग्रह न धरता, अट्टहास न करता निर्णय घ्यायला हवेत. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून जायचे नसेल तर त्यांच्या भावप्रज्ञेचा विकास करण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करण्याची आवश्‍यकताही गोर्ले यांनी अधोरेखित केली. अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. सकाळ प्रकाशनाच्या संपादिका दीपाली चौधरी यांनी प्रास्ताविक केले, तर ‘अक्षरधारा’चे मुकेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

गोर्ले यांची दोन्ही पुस्तके आणि सकाळ प्रकाशनाची इतरही पुस्तके सकाळ वाचक महोत्सवाच्या निमित्ताने वाचकांना आकर्षक सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

Web Title: pune news shivraj gorle talking