‘शिवशाही’ बसमुळे प्रवाशांची संख्या दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-रत्नागिरी आणि लातूर-पुणे या मार्गावरील प्रवासी संख्या दुपटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-रत्नागिरी आणि लातूर-पुणे या मार्गावरील प्रवासी संख्या दुपटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई-रत्नागिरी मार्गावर पूर्वीपासून चार एशियाड गाड्या सोडल्या जातात. सणवार वगळता या गाड्यांचे सरासरी प्रवासी भारमान चाळीस आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये भारमान मोठ्या प्रमाणावर घटते. वास्तविक, कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक असतानाही, एसटीचे प्रवासी कमी आहेत. कारण, मुंबईवरून रेल्वे, खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या संख्येने कोकणात जातात. मात्र, मुंबईहून रत्नागिरीसाठी शिवशाही बस सोडल्यापासून हे चित्र बदलले आहे. एक जूनपासून आजपर्यंत सातत्याने या बसचे प्रवासी भारमान ऐंशी टक्के राहिले आहे. तुलनेने एशियाड बसचे भारमान चाळीस टक्के कायम आहे. 

पुणे-लातूर मार्गावरील शिवशाही बसलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसचे प्रवासी भारमान पासष्ट टक्के आहे. ही बस लातूर डेपोवरून सुटते. त्यामुळे लातूरवरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीनुसार या गाडीचा वेळ निश्‍चित करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारसा फरक नाही. पुण्यावरून लातूरला जाण्यासाठीही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: pune news shivshahi bus passenger double