शिवशाही गाड्यांची तांत्रिक तपासणी होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे - एसटी महामंडळाकडे असणाऱ्या सर्व शिवनेरी गाड्यांची सर्वंकष तांत्रिक तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटीचे मॅकेनिकल इंजिनिअर आणि व्होल्वो कंपनीचे सुपरवायझर एकत्रित या गाड्यांची तपासणी करणार आहेत. येत्या आठ दिवसांत तपासणीचा अहवाल त्यांच्याकडून सादर केला जाणार आहे. त्या अहवालानुसार शिवनेरी गाड्यांमध्ये काही बदल करण्याची आवश्‍यकता असल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी खडकी येथे शिवनेरी गाडीची डिकी अचानक उघडून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या पार्श्‍वभूमीवर व्होल्वो कंपनीने तयार केलेल्या शिवनेरी गाडीमध्ये या प्रकारच्या अडचणी कशा निर्माण होतात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवनेरी ही गाडी एसटी महामंडळाकडे असलेली सर्वांत महत्त्वाची गाडी आहे. आरामदायी आणि सुरक्षित सेवेमुळे ही गाडी प्रवाशांच्याही पसंतीस उतरली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताने शिवनेरी गाडीमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. शिवनेरीच्या सर्व गाड्या राज्यभरात फिरत असतात, त्यामुळे या सर्व गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.

एसटी महामंडळाकडे असणाऱ्या शिवनेरी गाड्या या व्होल्वो कंपनीकडून तयार करून घेण्यात आल्या आहेत. गाडी चालू असताना गाडीची डिकी उघडत असेल, तर या गाड्यांमध्ये तांत्रिक समस्या असण्याची शक्‍यता आहे. शिवनेरी गाडीमध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रणा आहे. असे असतानाही रस्त्यावर गाडी चालू असताना डिकी उघडत असेल, डिकी उघडल्याचा आवाज (बीप) येत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी सर्व शिवनेरी गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, या तपासणीचा अहवाल येत्या आठ दिवसांत प्राप्त होणार आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news shivshahi vehicle technical cheaking