शिवसृष्टीबाबतचा तिढा आज मुंबईत सुटणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे - मेट्रो मार्गावर शिवसृष्टी उभारण्याबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ६) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. यात शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्‍यता आहे. 

वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर कोथरूडमधील कचरा डेपोच्या जुन्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेने यापूर्वी मंजूर केला आहे; परंतु त्या ठिकाणी मेट्रोचा डेपो उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शिवसृष्टी उभारून त्या खाली मेट्रोचा डेपो उभारावा, असा प्रस्ताव महामेट्रोला सुचविला होता; परंतु तसे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसृष्टीसाठी चांदणी चौकात जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणाच्या जागेत शिवसृष्टी उभारावी, असे महामेट्रोचे म्हणणे आहे. त्याला शिवप्रेमी संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे या वादात मुख्यमंत्री फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. 

शिवसृष्टीचा निर्णय तातडीने न झाल्यास ११ फेब्रुवारीपासून महामेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी नुकताच दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून बैठकीचे आयोजन केले. मुंबईत होणाऱ्या बैठकीत पालकमंत्री बापट, महापालिकेचे पदाधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांचे गटनेते; तसेच महापालिकेचे, महामेट्रोचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसृष्टीचा निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: pune news shivsrusti metro route