व्रतवैकल्यांचा महिना...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

श्रावणासाठी आम्ही ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, नारळ, नागनरसोबाचा कागद, मंगळागौर पूजा, सत्यनारायण पूजा यांसारख्या विविध पूजासाहित्याच्या विक्रीसाठी अगोदरच ऑर्डर देतो. आमचा हा परंपरागत व्यवसाय आहे. श्रावणात हमखास या वस्तूंची मागणी होतेच. त्यामुळे अगदी दहा रुपयांपासून विविध वस्तू उपलब्ध आहेत.
- जावेद शेख, विक्रेते

पुणे - श्रावणी सोमवारचे व्रत, महादेवाला शिवामूठ, जिवती अन्‌ नागनरसोबाचे पूजन, नवविवाहितेचे मंगळागौर पूजन, सोळा सोमवारच्या व्रताचा प्रारंभ, श्रावणी शुक्रवारचे व्रत आणि घरोघरी होणारे धार्मिक कहाण्यांचे वाचन. गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्सव अन्‌ सार्वजनिक ठिकाणच्या आयोजिण्यात येणाऱ्या सत्यनारायण पूजा. उद्या सोमवारपासून (२४) व्रतवैकल्यांचा आणि धार्मिक सणउत्सवांचा श्रावण महिना सुरू आहे. यानिमित्ताने पावसाचे तुषार अंगावर झेलत धार्मिक पुस्तके, पूजा साहित्य खरेदीचा आनंद रविवारी पुणेकरांनी घेतला. 

आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासही सुरू झाला आहे. श्रावणही सुरू होत आहे. यानिमित्ताने मठ-मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांची वेळपत्रके लागली आहेत. विशेषतः महादेवाच्या मंदिरांमध्ये लघुरुद्र, महारुद्राभिषेकांचे नियोजन ब्रह्मवृंदातर्फे करण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. श्रावणातील शुद्ध पंचमीला नागपंचमी, श्रीयाळ षष्ठी, नारळी पौर्णिमा (राखी पौर्णिमा), पिठोरी अमावास्या, बैलपोळा हे देखील सण-उत्सव आहेत. या महिन्यात गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार यांसारख्या विविध ग्रंथांचीही मठ-मंदिरांमध्ये पारायणे सोहळा आयोजिण्यात येतात. त्यामुळे धार्मिक पुस्तकांची दुकानांसहित भाजी मंडई, फुलबाजारतही मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली आहे. मंडई, तुळशीबाग परिसर, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतची धार्मिक पुस्तकांच्या दुकानात खरेदीसाठी नागरिकांची गर्दीही पाहायला मिळत आहे. विशेषतः नागनरसोबाचा कागद, जिवतीचे पूजन, आघाडा, दूर्वा, फुलांची मागणी या महिन्यात प्रामुख्याने असते. त्यामुळे पूजा साहित्य, धार्मिक पुस्तकांची आवर्जुन खरेदी-विक्री होते. कापसाची माळावस्त्रे, सुपाऱ्या, ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, विड्याची पाने, फळे, हळदी कुंकू, जानवी जोड या सारख्या विविध वस्तूंनी धार्मिक विधींकरिता हमखास लागतात. परिणामी, कोट्यवधींची उलाढाल या महिन्यात होत असते. छोट्या विक्रेत्यांच्या आघाडा-दूर्वा-फुलांच्या हातगाड्या दिसू लागल्या आहेत. विड्याच्या पानांच्या व्यापारी माजी नगरसेविका मदिना तांबोळी म्हणाल्या, ‘‘निंबगाव केतकी, जठार येथून विड्याची पाने येतात. श्रावणात धार्मिक कार्यक्रमांमुळे विड्याच्या पानांना मागणी असतेच असते. अडीचशे पाने असलेली एक टोपली या प्रमाणे दररोज सहा ते सात टोपल्या विड्याची पाने आम्ही विक्रीस आणतो. पण श्रावणात दुपटीने पानांची विक्री होते.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Shravan festival