श्रीपाल सबनीस यांना पुन्हा धमकीचे पत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना पुन्हा एकदा धमकीचे निनावी पत्र आले आहे. "सोशल मीडिया'वर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह लेखन झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या संरक्षणात वाढ केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनादरम्यान डॉ. सबनीस यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात आले. त्यांच्यासोबत कायम दोन पोलिस कर्मचारी ठेवले गेले. काही महिन्यांनंतर, "पोलिस संरक्षण कमी करा,' असे सबनीस यांनी स्वतःहूनच पोलिसांना सांगितले. त्यामुळे एक पोलिस कर्मचारी कमी करण्यात आला; पण सबनीस यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र आले आहे. पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरण, मोगलांवरील धडे वगळणे, या विषयांवर व्यक्त केलेल्या परखड विचारांमुळे धमकी आल्याची शक्‍यता सध्या वर्तवली जात आहे.

धमकीचे पत्र आणि "सोशल मीडिया'वरील मजकूर पोलिस आयुक्त आणि सायबर गुन्हे शाखेला दिल्यानंतर त्यांनी सबनीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सबनीस यांच्या प्रत्येक जाहीर समारंभाला आता तीन पोलिस कर्मचारी उपस्थित राहात आहेत. या संदर्भात सबनीस म्हणाले, 'नेमकी धमकी कोण देत आहे, हे कळत नाही. पोलिस तपास करत आहेत.''

Web Title: pune news shripal sabnis warning letter