पुणे: सिंहगडावर जाणाऱ्या अवसरवाडी घाट रस्त्याची दुरवस्था

महेंद्र शिंदे
रविवार, 16 जुलै 2017

कोंढणपूर मार्गे अवसरवाडी घाटातून अनेक पर्यटक सिंहगडावर जातात. सध्या पाऊस सुरु असल्याने या रस्त्याने सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या घाट रस्त्याची दुरवस्था झाल्याने पर्यटकांसाठी ही घाट रस्त्याची वाट बिकट झाली आहे.

खेड-शिवापूर : कोंढणपूरमार्गे सिंहगडावर जाणाऱ्या अवसरवाडी घाट रस्त्याची गेल्या दोन वर्षापासून दुरवस्था झाली आहे. सध्या पावसामुळे हा रस्ताच वाहून गेला असून येथून वाहन चालविणे जीवघेणे झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना या रस्त्याअलीकडेच वहाने उभी करुन सिंहगडावर जावे लागत आहे. 

कोंढणपूर मार्गे अवसरवाडी घाटातून अनेक पर्यटक सिंहगडावर जातात. सध्या पाऊस सुरु असल्याने या रस्त्याने सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या घाट रस्त्याची दुरवस्था झाल्याने पर्यटकांसाठी ही घाट रस्त्याची वाट बिकट झाली आहे. पूर्वी येथील खड्डे पडलेल्या रस्त्यावरुन वहाने दरीत कोसळून अपघात झाले आहेत.  सध्या तर पावसाने या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. गेले दोन दिवस झालेल्या  पावसाने या रस्त्यावरील मुरूम, खडी, माती वाहून गेली असून मोठे खड्डे पडले आहेत. तसेच याठिकाणी तीव्र चढ़ असल्याने वाहने पाठीमागे घसरून दरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

सध्या या घाट रस्त्यावरून वाहने चालविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे रविवारी पर्यटकांनी या घाट रस्त्याअलीकडे वाहने उभी केली. त्यानंतर घाट रस्त्यापालिकडे असलेल्या खासगी वाहनांनी पर्यटकांना सिंहगडावर जावे लागले. तर अनेकजण सिंहगडावर पायी गेले. 

अशी या घाट रस्त्याची परिस्थिती झाली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या वादात गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्याचा पर्यटकांना त्रास होतो असून याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भिती आहे. 
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता "या घाट रस्त्याच्या दुरुस्तीची परवानगी वन विभागाकडून मिळाली आहे. तसेच दुरुस्तीची निविदाही मंजूर झाली आहे. या रस्त्याचे काही काम डांबरीकरण आणि काही काम कॉंक्रीटीकरणात करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाला सुरूवात करण्यात येईल." असे या विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune news singhgad fort road condition