वाद टाळण्यासाठी अभ्यासगट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे - सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षकांचे थकीत वेतन, त्यावरून निर्माण झालेला वाद यांसारखे प्रकार विद्यापीठाशी संलग्न अन्य शिक्षण संस्थांमध्ये घडू नयेत, म्हणून कोणत्या उपाययोजना करता येतील, हे ठरविण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज केली.

पुणे - सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षकांचे थकीत वेतन, त्यावरून निर्माण झालेला वाद यांसारखे प्रकार विद्यापीठाशी संलग्न अन्य शिक्षण संस्थांमध्ये घडू नयेत, म्हणून कोणत्या उपाययोजना करता येतील, हे ठरविण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज केली.

अधिसभेत पंकज मणियार यांनी ‘सिंहगड’मधील वादाबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर अन्य सदस्यांनी विद्यापीठाने कारवाई करण्याबाबत विलंब केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हे प्रकार अन्य संस्थांमध्ये घडू नयेत, यासाठी विद्यापीठ काय करणार, या प्रश्‍नाला उत्तर देताना कुलगुरूंनी अभ्यासगट स्थापन करण्याची घोषणा केली. दादाभाऊ शिनलकर यांनी समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीसंदर्भात विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रश्‍न विचारला. 

अधिसभा सदस्यांनी एकूण ४७ प्रश्‍न विचारले होते; परंतु प्रश्‍नोत्तरांना दिलेल्या एका तासात त्यातील सहा ते सात प्रश्‍नांवर चर्चा होऊ शकली. अन्य प्रश्‍नांना वेळ मिळाला नसल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्‍नोत्तरासाठी पुढील अधिसभेत दोन तासांचा वेळ निश्‍चित करावा, अशी मागणी संतोष ढोरे यांनी केली.

‘पूर्वीचे पुणे विद्यापीठ’ का?
डॉ. धनराज माने यांनी, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण झाले असताना कंसामध्ये ‘पूर्वीचे पुणे विद्यापीठ’ असे वाक्‍य का वापरले जाते, ते वापरणे बंद करावे,’ अशी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना डॉ. विजय खरे म्हणाले, ‘‘अनेक परदेशी विद्यापीठांबरोबर आपल्या विद्यापीठाचे करार हे ‘पुणे विद्यापीठ’ नावाने झाले आहेत. विद्यापीठाचे नामकरण झाल्याने हे खासगी विद्यापीठ वाटू नये म्हणून ‘पूर्वीचे पुणे विद्यापीठ’ असे लिहिले जाते. काळाच्या ओघात ते वापरणे बंद होईल.’’

पॅरासाइटचे करायचे काय?
बागेश्री मंठाळकर यांनी वसतिगृहात पॅरासाइट म्हणून राहणारे विद्यार्थी; तसेच त्यांच्याकडून इतर विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रश्‍न उपस्थित केला. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे विद्यापीठात थांबून असतात, असेही त्या म्हणाल्या. त्यावर, ‘‘विद्यापीठ आणि वसतिगृह प्रवेशाच्या नियमावलीत सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. याच शैक्षणिक वर्षापासून त्या लागू करण्याचा प्रयत्न करू,’’ असे कुलगुरू म्हणाले.

बांधकामांच्या चौकशीची मागणी 
विद्यापीठातील इमारतीचे बांधकाम सुरू कधी झाले, त्याची मुदत किती होती, काही बांधकामांना मुदतवाढ दिल्याने विद्यापीठाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा संतोष ढोरे यांनी मांडला. त्यावर कुलगुरू म्हणाले, ‘‘संबंधित कामांची कागदपत्रे पडताळली जातील. त्यानंतर आवश्‍यकता भासल्यास चौकशी समिती नेमली जाईल.’’

Web Title: pune news sinhgad technical education society teacher salary issue